संतूरच्या तारा स्तब्ध झाल्या… सुर झंकार लोपला..

संतूर वाद्य आज पोरकं झालं. संतूरच्या तारा आज शांत झाल्या आणि अखेर सूर लोप पावले. प्रसिद्ध संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे आज सकाळी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी मनोरमा आणि मुलगा राहुल शर्मा आहे.

संतूर या वादनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करण्याचे काम पंडित शिवकुमार शर्मा यांनी केले. पंडित हरिप्रसाद चौरसिया आणि पंडित शिवकुमार शर्मा हा जोडी शिव-हरी म्हणून प्रसिद्ध आहे. चांदनी सिनेमातले मेरे हाथो में नौ नौ चुडीया या गाण्याचे संगीत हे या जोडीच्या संगीताचा एक नमुना होय.
शिव हरी या जोडीची एक कॅान्सर्ट १५ मे ला होणार होती. मात्र गेले काही दिवस शिवकुमार यांना किडनीचा त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांची प्राण ज्योत मालवली. शिवकुमार शर्मांच्या जाण्याने सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, या शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंडितजींना आदरांजली वाहिली.

मूळच्या जम्मू येथे जन्मलेल्या शिवकुमार शर्मा यांना १९९१ साली पद्मश्री आणि २००१ साली पद्म विभूषण या सर्वोच्च सन्मानाने नावजण्यात आले होते. मूळच्या पहाडी वाद्याला भारतीय संगीतात मानाचे स्थान देण्यात पंडित शिवकुमार शर्मा यांचा मोलाचा वाटा आहे. पण आज त्यांच्या निधनाने पुन्हा एकदा स्वर, संतूर आणि साज पोरके झाले.

आदरणीय पंडित शिवकुमार शर्मा यांनी न्यूज अनकट तर्फे भावपूर्ण आदरांजली.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा