इतका घसरला शेअर बाजारात स्टॉक, झोमॅटोच्या गुंतवणूकदारांचे पैसे आले अर्ध्यावर

मुंबई, 28 जानेवारी 2022: फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोनेही शेअर बाजारात पेटीएमचा मार्ग पकडला आहे. मंगळवारी काही प्रमाणात सावरल्यानंतर काल पुन्हा झोमॅटोच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. गुरुवारच्या व्यवहारात हा शेअर पुन्हा 10 टक्क्यांवर आला.

इतकं कमी झालं मार्केट कॅप

काल झोमॅटोचे शेअर्स BSE वर 9.95 टक्क्यांनी घसरून 90.50 रुपयांवर बंद झाले. या स्टॉकच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा हे जवळपास 50 टक्क्यांनी खाली आहे. याचा अर्थ झोमॅटोमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचे आतापर्यंतच्या उच्च स्तरावरून निम्मे पैसे बुडाले आहेत. कंपनीचे एम-कॅप एके काळी 1 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेलं होतं, ते आता 71,196 कोटी रुपयांवर घसरलं आहे. गेल्या आठवड्यापासून झोमॅटोच्या स्टॉकमध्ये सातत्याने घट होत आहे. हा स्टॉक 7 पैकी 6 ट्रेडिंग सत्रांमध्ये तोट्यात आहे.

संस्थापक पाहत होते याची वाट

कंपनीच्या संस्थापकाने नुकतेच सतत घसरणीबद्दल सांगितलं होतं की ते याची वाट पाहत आहेत. त्यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, मला तुम्हाला एक गुपित सांगायचे आहे. मी बराच वेळ बाजार पडण्याची वाट पाहत होतो. बाजार कोसळला की सर्वत्र निधी संपतो. अशा परिस्थितीत केवळ तीच कंपनी टिकू शकते, जिच्याकडं चांगले कर्मचारी आहेत आणि ती कंपनी अव्वल ठेवण्यासाठी सतत काम करत असते.

अनेक IPO रांगेत

नवीन तंत्रज्ञान कंपन्या शेअर बाजारात सातत्याने खराब कामगिरी करत आहेत. केवळ Zomato आणि Paytmच नाही तर Nykaa, Policy Bazaar, Cartrade Tech सारख्या स्टार्टअप कंपन्यांच्या स्टॉकमध्येही भूतकाळात मोठी घसरण झाली आहे. मात्र, त्यानंतरही नवीन आयपीओची रांग लांबली आहे. येत्या काळात ओला, ओयोसह अनेक स्टार्टअप कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा