‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा आला प्रत्यय; सीरियात भूकंपातील ढिगाऱ्याखाली झाला बाळाचा जन्म

पुणे, ११ फेब्रुवारी २०२३ : तुर्की आणि सीरिया येथे भूकंपामुळे १५ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि हजारो लोक जखमी झाले आहेत; अब्जावधी रुपयांच्या संपत्तीचं नुकसान झालं आहे. ढिगाऱ्याखालून अजूनही लोकांना बाहेर काढलं जात आहे. कोणालाही ढिगाऱ्याखालून काढलं की सर्वांत आधी ती व्यक्ती जिवंत आहे की नाही हे आधी पाहिलं जात आहे; पण भूकंपग्रस्त सीरियात ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणींची प्रत्यय आला.

याविषयी अधिक माहिती अशी, की भूकंपग्रस्त सीरियाच्या गेंड्रिस शहरात घराच्या ढिगाऱ्याखाली बाळाला जन्म दिल्यानंतर एका आईचा मृत्यू झाला; मात्र मदत आणि बचाव पथकाने बाळाची त्याच्या मृत आईला जोडलेली नाळ कापून सुटका केली.

दरम्यान, बाळाच्या वडील आणि भावंडांचाही विनाशकारी भूकंपात मृत्यू झाला आहे. बाळाचे नाव अया असे ठेवण्यात आले आहे. अया म्हणजे चमत्कार. अयाच्या वडिलांचे काका म्हणाले, की बाळ जिथे सापडलं होतं, तिथेच त्याचं घर होतं. बाळाच्या कुटुंबातील सर्व सदस्य मृत्युमुखी पडले आहेत. वाचला आहे हा चिमुकला जीव. तिला जवळ घेऊन खेळवायलाही कोणी राहिलं नाहीय. तिला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते तिला घरी घेऊन जातील. सलाह अल-बद्रनचे स्वत:चे घरही भूकंपात उद्ध्वस्त झाले असून, ते सध्या कुटुंबासह तंबूत राहत आहेत. अयाच्या बचावाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अर्थात, ही गोष्ट केवळ चिमुकल्या बाळाची नाही. तुर्की आणि सीरियातले कित्येक लोक अशा अनुभवातून जात आहेत. जे वाचू शकले, त्यांचे अनुभव चमत्कार मानले जात आहेत आणि जे वाचले नाहीत, त्यांच्या केवळ आठवणीच उरल्या आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा