बीबीसीवर भारतात पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

नवी दिल्ली, १० फेब्रुवारी २०२३ : हिंदू सेनेच्या अध्यक्षांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली. भारतातील ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनवर (बीबीसी) पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी हिंदू सेनेकडून करण्यात आली होती.

न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती एमएम सुंदरेश यांच्या खंडपीठाने हिंदू सेनेचे अध्यक्ष विष्णू गुप्ता आणि शेतकरी बीरेंद्र कुमार सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना असे म्हटले आहे की, बंदी घालणे पूर्णपणे चुकीचे आहे.

दरम्यान, हिंदू सेनेच्या अध्यक्षांनी गुजरात दंगलीतील पंतप्रधानांच्या कथित भूमिकेवर आधारित माहितीपट प्रसारित करण्यासाठी बीबीसी आणि बीबीसी इंडियावर बंदी घालण्याची मागणी केली होती. याबाबत हिंदू सेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी पार पडली. त्यात सर्वोच्च न्यायालयात ही याचिका फेटाळून लावली आहे.

यावेळी सर्वोच्च न्यायालयाने ‘आमचा वेळ वाया घालवू नका’ अशी टीका देखील केली आहे. या याचिकेत हस्तक्षेप करण्याचे कोणतेही कारण नाही आणि ती सुनावणीयोग्य नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने (BBC) 2002 च्या गुजरात दंगलीत पंतप्रधान मोदींवर एक माहितीपट प्रसारित केला होता. ज्यावर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. त्यानंतर हिंदू सेनेच्या अध्यक्ष विष्णू गुप्ता आणि बिरेंद्र कुमार सिंग यांनी बीबीसी आणि बीबीसी इंडियावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. याशिवाय अधिवक्ता बरुण कुमार सिन्हा यांच्यामार्फत दाखल याचिकेत न्यायालयाने राष्ट्रीय तपास संस्थेला भारतविरोधी डॉक्युमेंटरी बनवल्याबद्दल चौकशी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा