अखेर होणार शपथविधी …

मुंबई, २१ जुलै २०२२: मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, या प्रश्नाकडे जनता लक्ष ठेवून आहे. या प्रश्नाचे उत्तर अखेर शिंदेगटाने दिले आहे. मंत्रिमंडळ विस्ताराची पहिल्या टप्प्यातील यादी आता फायनल करण्यात आली आहे. यातील मंत्र्यांचा शुक्रवारी म्हणजेच २२ जुलैला शपथविधी होऊ शकतो. दोन टप्प्यात मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार असून, पहिल्या टप्प्यात ३० जणांचा शपथविधी होऊ शकतो.

नव्या मंत्रिमंडळात भाजप आणि शिंदे गटातील मंत्र्यांचा समावेश आहे. ज्यात दोन तृतीयांश मंत्री हे भाजपच्या गटातले असतील, तर उरलेले शिंदे गटातील मंत्री असतील.

यात चंद्रशेखर पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, जयकुमार रावल आणि आशिष शेलार यांच्या नावाचा पहिल्या यादीत समावेश आहे. बंडखोर नऊ नेत्यांना टप्प्याटप्याने मंत्रिमंडळात स्थान मिळेल.

गेल्या २० दिवसांपासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघे राज्याचा कारभार चालवत आहे. त्यामुळे विरोधक त्यांना कायम घेरत आहेत. पण आता हा प्रश्न निकालात काढण्यावर शिंदे आणि फडणवीस सरकारनं भर दिला आहे.

एकनाथ शिंदेच्या बंडखोरीनंतर १६ बंडखोर आमदारांना विधानसभेच्या उपाध्यक्षांनी अपात्रतेची नोटीस बजावली होती. ज्यावर १ ऑगस्टला सुनावणी होणार आहे. मात्र विधानसभेत बहुमत मिळण्याआधीच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.

सध्या भाजप, शिंदे गट आणि अपक्ष मिळून १६४ सदस्यांच्या पाठिंब्यावर नवे सरकार स्थापन झाले आहे. पण आता कोणाला कुठली खाती मिळणार आणि कोण कुठल्या खुर्चीवर विराजमान होणार, यावरुन आधीपासूनच वादंग माजायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता या खात्यांवरुन नक्की कोणते रामायण होणार, कोण खुश आणि कोण नाखूश होणार, हे २२ जुलैला समजेल. तोपर्यंत वेट अँण्ड वॉच…

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा