तालिबानने भारतीय प्रकल्पाचे केले कौतुक, पण भारताने सैन्य पाठवल्यास दिली चेतावणी

नवी दिल्ली, १५ ऑगस्ट २०२१: एकापाठोपाठ एक अफगाणिस्तानातील महत्त्वाची शहरे तालिबानच्या ताब्यात येत आहेत. काबुलच्या जवळ पोहोचलेल्या तालिबानने अफगाणिस्तानमधील भारताच्या प्रकल्पांविषयी सांगितले की, भारताने अफगाणिस्तानच्या लोकांसाठी केलेल्या प्रत्येक गोष्टीचे आम्ही कौतुक करतो.

तालिबानचे प्रवक्ते मोहम्मद सुहेल शाहीन यांनी म्हटले आहे की, आम्ही धरण, राष्ट्रीय आणि पायाभूत सुविधा प्रकल्प आणि अफगाणिस्तानच्या लोकांच्या विकास, पुनर्रचना आणि आर्थिक समृद्धीसाठी असलेल्या प्रत्येक प्रकल्पाचे कौतुक करतो.

जर भारताने सैन्य पाठवले तर …

एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत तालिबानचे प्रवक्ते सुहेल शाहीन म्हणाले की, जर भारताने अफगाणिस्तानात सैन्य पाठवले तर ते त्यांच्यासाठी चांगले होणार नाही. भारताने अफगाणिस्तानात इतर देशांच्या लष्करी उपस्थितीचे भवितव्य पाहिले आहे. त्यांच्यासाठी हे खुले पुस्तक आहे. अफगाणिस्तानची जमीन भारताच्या विरोधात वापरली जाणार नाही या आश्वासनाशी संबंधित प्रश्नावर तालिबान प्रवक्त्याने सांगितले की आमचे एक समान धोरण आहे.

ते म्हणाले की, शेजारील देशांसह कोणत्याही देशाविरुद्ध अफगाणिस्तानची जमीन वापरू न देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तालिबानच्या प्रवक्त्याने भारतीय शिष्टमंडळाला भेटण्याच्या वृत्ताबद्दल सांगितले की याची पुष्टी होऊ शकत नाही. ते असेही म्हणाले की, आमची दोहामध्ये बैठक झाली होती ज्यात भारताचे शिष्टमंडळही होते. माझ्या माहितीप्रमाणे, भारतीय शिष्टमंडळासोबत स्वतंत्र बैठक झालेली नाही.

शिखांनीच निशान साहिब काढला होता

तालिबानच्या प्रवक्त्याने गुरुद्वारातून निशान साहिब काढण्याबाबत सांगितले की, ते शीख समुदायाच्या लोकांनी काढले आहे. ते म्हणाले की जेव्हा आमचे अधिकारी तेथे गेले तेव्हा त्यांनी शीख समुदायाच्या लोकांना आश्वासन दिले की ध्वज पाहून कोणीही त्यांना त्रास देणार नाही. यानंतर शीख समुदायाच्या लोकांनी गुरुद्वारावर पुन्हा निशान साहिब फडकवला. तालिबानचे प्रवक्ते सुहेल शाहीन यांनी पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांशी घनिष्ठ संबंध असल्याचा आरोप फेटाळून लावला. ते म्हणाले की हे आरोप निराधार आहेत. आम्ही कोणत्याही देशाच्या दूतावास किंवा मुत्सद्याला लक्ष्य करणार नाही असेही ते म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा