जालन्याच्या पेरुची चव कलकत्ता सुरत सह नेपाळ मधील खवय्याच्याही जिभेवर

8

जालना ७ जानेवारी २०२४ : जालना जिल्हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी ही ओळख पुसून टाकत शेतीत नवनवीन प्रयोग करत यशस्वी शेती करण्याचं काम जिल्ह्यातील शेतकरी करत आहेत. जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील हसनाबाद येथील शेतकरी मनोज लाठी यांनी देखील आपल्या पारंपरिक शेतीला प्रयोगशीलतेची जोड देत रासायनिक खतांचा वापर न करता फक्त सेंद्रिय पद्धतीने पेरूची बाग फुलवली आहे.

पारंपरिक शेतीत विशेष काही मिळत नाही म्हणून मनोज लाठी यांनी शेतीकडे पाठ फिरवून काही दिवस गुत्तेदारी करून पाहिली. तिथेही जम बसेना म्हणून काही दिवस त्यांनी वीट भट्टीचा व्यवसाय देखील केला, सोबत इतरही काही व्यवसाय करून पाहिले. त्यात समाधान न मिळाल्याने २०१७ मध्ये पुन्हा शेतीकडे वळले. वडिलोपार्जित जमिनीत काही करता येईल या निश्चयाने त्यांनी आपल्या कौटुंबिक १६ एकर जमिनीत नवं नवे प्रयोग करून पाहिले.त्यांनी केशर अंबा,सीताफळ यांची लागवड करून चांगले उत्पन्न मिळवल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला.आता पुन्हा वेळ आली होती काही तरी नवीन प्रयोग करण्याची.आपल्या मुलासोबत चर्चा करून अखेर पेरूची शेती करण्यावर शिक्कामोर्तब झालं.

इंटरनेटवरून माहिती घेऊन छत्तीसगढ येथील रायपूर येथून २१०/- प्रती रोप या किमतीचे १ हजार पेरूची रोपे खरेदी केली. या रोपांची त्यांनी ८ बाय १२ अंतरावर आपल्या शेतात लागवड केली. त्याचा फायदा असा झाला की, या अंतरात त्यांना आंतरपीकही घेता आलं. लागवडीनंतर पहिल्या वर्षी पेरूचे बऱ्यापैकी उत्पन्न झाले. मात्र, मागील दोन-तीन वर्ष त्यांची पेरू बाग तोट्यात गेली असली तरी आंतरपीक म्हणून घेतलेल्या अद्रक आणि फुलशेतीने त्याची कसर भरून निघाली होती. यातून त्यांचा पेरू लागवडीचा खर्च भरून निघाला.

सतत दोन वर्ष खूप कमी उत्पन्न आले तरी मनोज लाठी हरले नाही. नव्या जोमाने त्यांनी या वर्षी पेरू बागेचे व्यवस्थित नियोजन केले. रासायनिक खते तसेच औषधांच्या नादी न लागता शेणखत व गांडूळ खताची मात्रा पेरूच्या बागेला दिली. गाईचे शेण, गोमुत्र यापासून तयार केलेली स्लरी पेरूच्या झाडांना दिली. त्याचा फायदा असा झाला की पेरूच्या उत्पादनात मोठा फरक तर पडलाच पण पेरूची गुणवत्ता सुध्दा वाढली. पेरूची झाडे अशी बहरली की या वर्षी त्यांना पेरूचे २५ ते ३० टन उत्पन्न झाले आहे. पेरूची चव व गुणवत्ता चांगली राहावी त्यावर कुठला रोग पडू नये यासाठी पेरू फळे लहान असतानाच त्यांवर आवरण बसविले यामुळे फळाला रोग कीडचा प्रादुर्भाव झालाच नाही आणि थेट ग्राहकांपर्यंत स्पर्श विरहित माल पोहचवला गेला.

पेरूची तोडणी सुरू होताच व्यापारी बाग खरेदीसाठी येऊ लागले. सुरत येथील व्यापाऱ्याने यात बाजी मारली आणि २३ क्विंटलची पाहिली खेप सुरतला पाठवली गेली. त्यानंतर लाठी यांनी मागे वळून बघितलेच नाही. सुरतच्या व्यापाऱ्याने या गुणवत्तापूर्ण पेरूला ४८ रुपये प्रतिकिलोचा दर दिल्यानंतर महाराष्ट्रासह कलकत्ता आणि थेट नेपाळ पर्यंत लाठी यांच्या शेतातील पेरूनी मजल मारली. या वर्षी पेरूच्या बागेला बहार जोरदार आला असून २५ ते ३० टन पेरुंची विक्री झाली असून आता शेवटचा बहार असून तोही लाख दीड लाखाचे उत्पन्न देईल. आता पर्यंत ८ ते साडे आठ लाखाचे उत्पन्न झाले असून जवळपास १० लाख रुपयांचे उत्पन्न या वर्षी मिळेल याची त्यांना खात्री आहे.

आपल्या दुष्काळी भागात कमीत कमी खर्च करून कुठले पीक घ्यायचे याची माहिती घेत असताना छत्तीसगढ राज्यातील रायपूर येथील पेरूची माहिती लाठी यांना मिळाली होती. आता त्यांच्या बागेतील पेरू थेट राज्याच्या सीमा ओलांडून गेले असून त्यांना भावही चांगला मिळाला आहे. त्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांनी पारंपरिक शेती सोबत फळबागा लावण्याकडे वळावं असं मनोज लाठी म्हणतात.

न्युज अनकट प्रतिनिधी : विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा