पुणे २७ जून २०२३: महाराष्ट्रातून अनेक गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. अशीच एक गंभीर घटना पुण्यातून समोर आलीय. पुण्यात दहशत निर्माण करणारी टोळी सक्रिय झाली असून पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड झाल्याची घटना समोर आली. या घटनेत वाहनधारकांचे मोठे नुकसान झालय.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील अरण्येश्वर परिसरात मध्यरात्री एका टोळक्याने वाहनांची तोडफोड केली. या घटनेत १० ते १५ वाहनांचे नुकसान झाले असून या चोरट्यांच्या टोळीने लोकांच्या घरावर दगडफेकही केली आहे. या घटनेने पुण्यात खळबळ माजलीय.
हा परिसर सहकारनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत आहे. ही घटना पुण्यातील अरण्येश्वर भागात घडली. या टोळीने आठ दिवसांपूर्वी सहकार नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनांची तोडफोड केली होती. आता पुन्हा एकदा असाच प्रकार घडल्याने या टोळीला पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झालय.
दरम्यान, या टोळीकडून घराबाहेर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली जात असल्याने, नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. वाहने खराब झाल्याने आर्थिक नुकसान ही प्रचंड प्रमाणात होतंय. अशा घटना सातत्याने घडत आहेत. ही बाब वाहनधारकांसाठी अत्यंत चिंतेची आहे. पोलिसांनी या टोळीला लवकरात लवकर अटक करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. सध्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- सूरज गायकवाड