पिंगोरीच्या दऱ्याखोऱ्यात बिबट्याची दहशत

4

पुरंदर .२६ ऑगस्ट २०२० :पुरंदर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गाव तसेच सैनिकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या पिंगोरी येथील दऱ्याखोऱ्यांमध्ये आता बिबट्याचा मोठ्या प्रमाणावर वावर वाढल्याने लोकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. गेल्या पंधरा दिवसात बिबट्याची पाळीव जनावरांवर हल्ला होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने लोकांकडून या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

मागील पंधरा दिवसात पिंगोरीतील शिंदेनगर परिसरात बिबट्याने दोन शेळी व एका वासराचा फडशा पाडला आहे. वर्षभरात बिबट्याने अनेक पाळीव‌ जनावरांचा फडशा‌ पाडला आहे. बिबट्याकडून पाळीव प्राण्यांवर होणाऱ्या वारंवार हल्ल्यामुळे येथील ग्रामस्थांचे पशुधन धोक्यात आले आहे. बिबट्याने हल्ला केल्यानंतर वनखाते या मृत जनावरांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणुन काही रक्कम देत असते. मात्र रक्कम मिळत असली तरी चांगले पशुधन नष्ट होत आहे. पुन्हा अशा प्रकारचे पशुधन तयार करणे शेतकऱ्यांपुढे मोठे जिकिरीचे काम असते.

त्यामुळे अशा पशुधनाचा नाश होऊ नये म्हणून शेतकरी नेहमीच प्रयत्नशील असतो. मात्र बिबट्याच्या या वारंवार हल्यामुळे हे पशुधन नष्ट होत आहे. त्याचबरोबर बिबट्याचा वावर आता लोकवस्तीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर होत आहे . त्यामुळे भविष्यात लोकांच्या जिवीतास सुद्धा धोका निर्माण झाला आहे. लहान मुले व महिला सध्या दहशतीखाली आहेत. शेतात काम करायला जाणे आता धोकादायक होऊन बसले आहे.

वनविभागाकडून मात्र यावर कोणताच ठोस उपाय केला जात नाही. उलट उभ्या असलेल्या व्यक्तीवर बिबट्या हल्ला करत नाही. काठीला घुंगरू बांधा, मोबाईलवर गाणी लावा, फटाके वाजवा असे सोपस्कर सल्ले देऊन वनविभाग आपली जबाबदारी झटकत आहे.

वनविभागाचे अधिकारी जयश्री जाधव, वाय.जे. पाचर्णे , बाळासाहेब गोलांडे यांनी पिंगोरी येथे भेट दिली. यावेळी पिंगोरीचे पोलीस पाटील राहुल शिंदे, माजी सरपंच पल्लवी भोसले,माजी उपसरपंच धनंजय शिंदे,जिवन शिंदे, श्रीरंग शिंदे,यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी वनविभाच्यावतीने बिबट्याच्या वर्तनाबाबात माहिती देऊन लोकांमध्ये पसरलेली बिबट्याची दहशत कमी करण्याचा प्रयत्न केला.

बिबट्या हा भित्रा प्राणी आहे. तुम्ही त्यांच्या वाटेला गेला नाही तर तो तुमच्यावर हल्ला करणार नाही. तसेच एखादे जनावर मारले तर त्याला सोडवण्याचा प्रयत्न करू नका. वनविभागामार्फत आपल्याला नुकसान भरपाई दिली जाईल. मात्र बिबट्याची शिकार सोडवण्याचा प्रयत्न केल्यास त्यात तो माणसावर हल्ला करू शकतो असे यावेळी त्यांनी सांगितले. मात्र वनविभागाच्या या सल्ल्याने ग्रामस्थ समाधानी नाहीत. शेतामध्ये काम करत असताना अनेक ठिकाणी महिला किंवा पुरुष एकटेच काम करत असतात. शेतामधील खुरपणी पाणी देणे अशा वेळी वाकून किंवा बसून काम केले जाते.तसेच जनावरांना चारा देण्यासाठी डोंगर द-यात एकट्याने जावे लागते. मग अशावेळी बिबट्याने हल्ला केला तर करायचे काय? असा प्रश्‍न ग्रामस्थ विचारू लागले आहेत. वनविभागाकडून मात्र बिबट्या असल्याचे मान्य केले तरी बिबट्याबाबत सकारात्मक उपाय योजना केल्या जात नाहीत.

न्यूज अनकट प्रतिनिधी राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा