नाशिक-पुणे खासगी बसला अपघात; चालक, प्रवाशांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली
पुणे, ६ डिसेंबर २०२२ : नाशिक येथून पुण्याला २५ ते ३० प्रवासी घेऊन निघालेल्या ‘वर्मा ट्रॅव्हल्स’च्या खासगी आराम बसला नारायणगावच्या पुढे मंचरजवळ इस्सार पेट्रोलपंपजवळ मंगळवारी (ता. सहा) सकाळी साडेअकाराच्या दरम्यान अचानक आग लागली. सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलिस उपनिरीक्षक सनील धनवे व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. या आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली.
नाशिकवरून पुण्याला वर्मा ट्रॅव्हल्स कंपनीची आराम बस (यूपी- ७५-२६९४) ही प्रवासी घेऊन पुण्याच्या दिशेला येत असताना नारायणगावच्या पुढील बाजूस मंचर हद्दीत असणाऱ्या इस्सार पेट्रोलपंपाजवळ गाडीचे इंजिन गरम झाल्याने गाडीच्या मागून धूर येऊ लागला.
प्रवाशांनी धूर निघत असताना, वाहनचालक श्री. पटेल यास याची कल्पना दिली असता, चालकाने त्वरित बस बाजूला घेऊन प्रवाशांना बाहेर काढले. थोड्याच वेळात आगीने रौद्र रूप धारण केले. नारायणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमन दलास कळविले; मात्र अग्निशमन दलाचे वाहन येईपर्यंत बस संपूर्ण जळून खाक झाली होती. रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी त्वरित वाहतुकीत बदल केला.