२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा दिवस अगदी तोंडावर आला आहे परंतु दोन महिन्यांपूर्वीपासून सुरू झालेले पक्षप्रवेश अजूनही थांबायचं नाव घेत नाहीयेत. कुणी कोणती मेगाभरती काढतं तर कुणी निरनिराळ्या प्रकारची बंधनं बांधतं. या सर्वात कुणी पारच लयाला गेलं तर कुणी अजूनही या वादळात लाकडाच्या ओंडक्याचा आधार शोधत फिरत आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात घाणेरडं राजकारण या गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रातील जनता अनुभवत आहे. या सर्वांवर आपण क्रमशः व्यक्त होणारच आहोत परंतु आज या मालिकेची सुरुवात आपण करणार आहोत सत्तेत नसूनही सलग पाच दशकं सत्तेची सूत्र जिथून हलवली जातात त्या ‘मातोश्री’ बद्दल! अगदी बरोबर ओळखलंत शिवसेनेबद्दल!
“आजपासून माझा बाळ मी या महाराष्ट्राला अर्पण करीत आहे”,असे उद्गार महाराष्ट्राचं जन्मस्थळ असलेल्या शिवाजी पार्कवर महाराष्ट्रासाठी खऱ्या अर्थाने झटलेल्या मुखांमधून निघाले होते. तत्क्षणी झाली शिवसेना या पक्षाची स्थापना आणि या पक्षाचे प्रमुख होते बाळ केशव ठाकरे म्हणजेच सर्वसामान्य जनतेचे, तुमचे आमचे सर्वांचे बाळासाहेब ठाकरे! १९ जून १९६६ साली शिवसेनेचे फक्त पक्षात रूपांतर झाल परंतु तत्पूर्वी ती फक्त एक समाजसेवी संघटनाच होती. आता हा इतिहास आपण जास्त ढवळायला नको, याच वर्षाच्या सुरुवातीला आलेल्या *ठाकरे* या सिनेमाद्वारे तो प्रत्येकाला माहीत झाला असेलच.
पक्ष स्थापन झाल्यानंतर लगेच काही पक्षाला यश मिळत नसतं आणि शिवसेनेबाबत देखील अगदी हेच झालं. शिवसेनेचा पहिला आमदार विधानसभेत जाण्यासाठी जवळजवळ २५ हुन अधिक वर्षांचा कालावधी लागला. त्यानंतर मात्र शिवसेनेच्या आमदारांची संख्या वाढतच गेली ती इतकी, की १९९६ साली सेना भाजप युतीची सत्ता राज्यात आली. अनेक राजकीय विरोधक हे बाळासाहेबांचे वैयक्तिक मित्र होते. या सर्व गोष्टींचं श्रेय हे बाळासाहेबांच्या नेतृत्वाला जात. गोर गरीब जनतेला आपल्या मराठी माणसाला त्यांनी आपल्या बाजूने ओढून घेतले. त्यानंतर त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा काढला आणि त्यामुळे संपूर्ण देशभरातून त्यांना पाठिंबा मिळाला. मुंबईत राहून दिल्लीची सूत्रे हलवणारा एकमेव राजकारणी म्हणजे बाळासाहेब ठाकरे! मग ते वाजपेयी सरकार असो वा इतर कोणतेही… दिल्लीवरून मुंबईत फोन कॉल्स यायचे कारण शिवसेनेच्या वाघाचा तेवढा दरारा होता. तब्बल ४७ वर्षे सलग बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना प्रमुख होते आणि हा एक जागतिक विक्रम आहे. कोणताही नेता सलग इतकी वर्षे कोणत्याही एका पक्षाचा अध्यक्ष कधीच राहिला नाही. मग स्टॅलिन असो किंवा लेनिन, लिंकन असो नाहीतर नेहरू, कुणीही नाही. या ४७ वर्षात बाळासाहेबांनी अनेक नेते घडवले. नेते घडवताना त्यांनी कधीच कोणत्याही जाती पातीचा विचार केला नाही. माणूस आवडला की दिली उमेदवारी… मनोहर जोशी, नारायण राणे, छगन भुजबळ, गणेश नाईक, प्रमोद नवलकर, वामन महाडिक, दत्ताजी साळवी हे याचेच द्योतक म्हणायचे. यामुळेच बाळासाहेबांभोवती विसाव्या शतकाच्या शेवटी शेवटी महाराष्ट्रतील नव्या पिढीचा तरुण आकर्षित होऊ लागला. त्यांना देव मानू लागला. बाळासाहेबांनी सामान्य माणसांमधून नेते घडवले, पण कधीच आयात केले नाहीत. ज्यांनी स्वतःहून प्रवेश केला त्यांना दारं उघडी होती मात्र पक्ष सोडून जाण्याची कुणाची हिम्मत नव्हती. बाळासाहेबांनीच त्यांच्या शिवसैनिकांना आदेश दिला होता जर एखादा जरी नेता फुटला, तर त्याला भर रस्त्यात तुडवा. ही बाळासाहेबांची जरब फक्त शिवसेना नेत्यांपूर्तीच मर्यादित नव्हती, तर विरोधी आणि मित्र पक्षांवरती देखील होती. मात्र एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच अशा या शिवसेनेला अर्थात बाळासाहेबांना धक्क्यांवर धक्के दिले ते त्यांचे जवळचे मित्र आणि राजकीय शत्रू शरद पवार यांनी! गणेश नाईक, छगन भुजबळ यांसारखे शिवसेनेचे महत्त्वाचे नेते त्यांनी फोडले. मग नारायण राणे देखील कुठे गप्प बसणार होते. त्यांनी देखील २००४ साली काँग्रेसची साथ पकडली. हे फोडाफोडीच राजकारण करायला शरद पवारांनी सुरुवात केली खरी, पण बाळासाहेबांनी कधीच ही नीती अवलंबली नाही. ते कायम नवे नेते तयार करण्यावर भर देत राहिले.
बाळासाहेब होते तोपर्यंत शिवसेना हा महाराष्ट्रातील एक प्रमुख पक्ष होता. बाळासाहेबांनंतर पुढील तीनच वर्षात सेना हा दुय्यम पक्ष ठरला. जेव्हा पूर्वी युतीचं सरकार होतं तेव्हा ते सेना-भाजपचं सरकार होतं आणि आता जे सरकार आहे ते भाजप सेनेच सरकार आहे. कारण सेनेने केलेली सत्तेसाठीची लाचारी. पक्ष नेतृत्वाची लाचारी ही यातून दिसून आली त्यामुळे जो मान शिवसेनेला युतीत होता किंबहुना लोकांच्या मनात होता, तो आजमितीला तरी नाही. उद्धव ठाकरेंनी तो लाचारी करून गमावला आहे. उद्धव ठाकरे इतके लाचार झालेत की, फक्त धमक्या देऊ लागलेत. उदा., सत्तेत आल्यानंतर दिलेली राजीनाम्याची धमकी.… ते राजीनामे शेवटी खिशातच राहिले. लहान बाळाला खुळखुळा दाखवून जसं शांत केलं जातं तसं फडणवीस उद्धव ठाकरेंना आमिश दाखवून गप्प करतात. बाळासाहेबांच्या उलट उद्धव ठाकरे फोडाफोडीच राजकारण लगेच शिकले. पण त्यांची ही फोडाफोडी इतर पक्षांमध्ये चालली नाही म्हणून त्यांनी ती त्यांचेच चुलते राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये केली. मुंबई महानगरपालिकेतील सत्ता वाचवण्यासाठी जो काही घोडेबाजार त्यांनी केला तो तर सर्वांना माहीतच आहे. एकाच रात्रीत त्यांनी मनसेचे सहा नगरसेवक फोडले आणि आता देखील मनसेचे शिशिर शिंदे, नितीन नांदगावकर यांच्यासारखे काही नेते नजीकच्या काळात त्यांनी फोडले. या सगळ्यात त्यांना मोलाची साथ दिली ती ठाण्याचे पालकमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी!
ही अशी विचित्र वेळ शिवसेनेवर का आली? यापूर्वी राज्यात फोडाफोडीच राजकारण झालं नव्हतं का? मग शिवसेनेलाच का बोल लावले जातात? तर या सगळ्याच उत्तर एकच आहे की, ही वेळ शिवसेनेवर खुद्द शिवसेनेमुळेच आली आहे. मुंबई महानगरपालिकेवर सलग २५ वर्षे सत्ता असताना शिवसेनेनं काय केलं? एमएमआरडीए ही व्यवस्था नसती, तर मुंबईतील अनेक उड्डाणपूल झाले असते का? रस्ते रुंद झाले असते का? गोवंडी ते सीएसटी हा पूर्व मुक्त मार्ग झाला असता का? बाकी उड्डाणपुले झाली असती का? सागरी सेतू झाला असता का? पश्चिम-पूर्व मार्गावरील उड्डाणपूल झाले नसते, तर या मुंबईची अवस्था काय झाली असती. हे सगळं त्या त्या वेळच्या सरकारने केले.. त्यात नितीन गडकरी यांचा मोठा वाटा आहे. विलासराव देशमुख यांचा मोठा वाटा आहे. तेव्हा एवढी वर्षे सत्ता हातात असताना यांनी मुंबईसाठी केले काय? हाच प्रश्न शिवसेनेला छळणार आहे.
शिवसेनेची राजकीय शक्ती क्षीण होत चाललेली आहे. शिवसैनिकांना ही फरफट मान्य नाही. कोणत्याही राजकीय पक्षाजवळ वडापाव खाऊन निवडणुकीत काम करणारे संघटन आज तरी नाही. ते फक्त शिवसेनेजवळ आहे. त्या तरुणांना बाळासाहेबांनी जी शिकवण दिली त्यापेक्षा सेनेचे नेतृत्व काही वेगळं करू पाहतंय. महापालिकेतील जी भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येत आहेत, त्यात शिवसेना आणखी उघडी पडत आहे.आज फरक काय झाला असेल, तर शिवसेना दुय्यम झाली. भाजपा वरचढ झाला. तेव्हाही केंद्रात भाजपाचाच पंतप्रधान होता. पण शिवसेनेला फटकारण्याची हिम्मत त्यावेळच्या भाजपाला होत नव्हती आणि पंतप्रधानांनासुद्धा होत नव्हती. आज राज्याचा मुख्यमंत्री सेनेच्या जबड्यात हात घालू शकतो आहे, तशी भाषाही करू शकतो. बाळासाहेबांनंतरचा हा मोठा फरक आहे. भाजपाबरोबर सरकारात बसलेल्या आपल्या मित्रपक्षाच्या नेत्याला अटक होऊ शकते असे सांगण्यापर्यंत भाजपाच्या नेत्यांची हिम्मत वाढलेली आहे.मुंबई शहरात शिवसेनेची शक्ती नेमकी किती? तर तीन आमदार..! विदर्भात शिवसेनेजवळ फक्त चार आमदार आहेत आणि भाजपाजवळ ४४ आमदार. मराठवाड्यात शिवसेनेजवळ ४६ पैकी ११ आमदार आहेत. ठाणे जिल्ह्यात सात आमदार आणि कोल्हापूर जिल्ह्यात सहा, त्यामुळे स्वबळावर महाराष्ट्रात प्रादेशिक पक्ष म्हणून बहुमत मिळवण्याची ताकद शिवसेनेत खरोखर आहे का? काही प्रमाणात मुंबई, ठाणे आणि औरंगाबाद या तीन शहरांमध्ये आणि उपनगरांत शिवसेना काही प्रमाणात तगून आहे याचे कारण अत्यंत वेगळे आहे. काही विपरित दंगा घडला तर.. अशा काल्पनिक भयाने ‘सेना हवी’ असे वाटणा-या मतदाराच्या मनातील भीती धनुष्य बाणाचे बटन दाबते आहे. बाकी तमाम महाराष्ट्रात २२५ मतदारसंघात शिवसेना आहे कुठे?
शिवसेना दुय्यम स्थानी जाण्याचं, ती बदनाम होण्याचं मुख्य कारण म्हणजे सध्याचं पक्ष नेतृत्व! या पक्षनेतृत्वाला खरे बाळासाहेब कधी कळलेच नाहीत. मूळ धोरणांपासून दूर सरकताना शिवसेनेची चिवसेना केव्हा झाली हे खुद्द उद्धव ठाकरेंना देखील कळले नाही. चुकीच्या नेतृत्वामुळे चुकीच्या हातात खासदारकी गेली आणि आजची शिवसेना ही फक्त बोलबच्चनगीरी करू शकते हे पुन्हा पुन्हा सिद्ध होतंय. लोकसभेवेळी केल्या गेलेल्या पहले मंदिर फिर सरकार या घोषणेमुळे तर ते आणखीनच गडद होत गेलं. या सगळ्यात सामान्य माणूस, सामान्य शिवसैनिक जो बाळासाहेबांच्या शिवसेनेत होता, तो आजच्या चिवसेनेत आपल्याला आढळत नाही. असं गलिच्छ राजकारण करून जर शिवसेना पुन्हा सत्तेत येऊ पाहत असेल, तर ती सत्ता त्यांची त्यांनाच लख लाभो… या सगळ्याचा विचार मात्र मतदार राजाने करायला हवा. त्यांना नेमकं हवंय तरी काय हिंदुत्त्वाचं राजकारण की आपल्या परिसराचा, समाजाचा विकास? मंदी हवी की, एक सुधारित अर्थव्यवस्था? बेरोजगारी हवी की रोजगार? या सगळ्याचा पूर्ण विचार करूनच यावेळेस मतदार राजा योग्य व्यक्तीसमोरील बटण दाबेल, अशी आशा करायला हरकत नाही. पुन्हा भेटू नव्या पक्षासह तूर्तास इथेच थांबू धन्यवाद!
Khoop maste lihila ahe. Kharach ahe, Waagh ata rahila nahi.
Maste lekh ahe. 👌