व्हायोलिनचा स्वर निमाला! सूरमणी पंडित प्रभाकर धाकडे यांचे निधन

पुणे, ९ जानेवारी २०२३ : ‘सूरमणी’ या उपाधीने गौरविण्यात आलेले नागपूरचे पंडित प्रभाकर धाकडे गुरुजी यांचे रविवारी (ता. आठ) निधन झाले. रविवारी (ता. एक) त्यांना श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याने व्हीम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हृदयावरील उपचार पूर्ण झाल्याने यकृत, मूत्रपिंड व फुफ्फुसांच्या संक्रमणावर उपचारासाठी त्यांना शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास वर्धा रोडवरील स्वास्थम या दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जात असताना, रुग्णवाहिकेतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. हे वृत्त पसरताच गुरुजींच्या सुरेल व्हायोलिनचे सूर नेहमीसाठी शांत झाले, अशी भावना संगीतप्रेमींनी व्यक्त केली. धाकडे गुरुजी यांची पाच दशकांहून अधिक काळातील संगीताची साधना होती. आजवर हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी घडविले आहे.

‘भास्कर संगीत विद्यालया’चे बालाजीपंत धाकडे यांनी वर्ष १९६६ मध्यमे गायन शाळेची सुरवात केली. पुढे सूरमणी पं. प्रभाकर धाकडे या त्यांच्या मुलाने शास्त्रीय गायनाची धुरा सांभाळली. पं. प्रभाकर धाकडे यांनी संगीतबद्ध केलेल्या चालींवर शंकर महादेवन, हरिहरन, अनुराधा पौडवाल, कविता कृष्णमूर्ती, सुरेश वाडकर यांच्यासारख्या दिग्गज पार्श्वगायकांनी बुद्ध गीते व गझलांचे गायन केले आहे. ‘भारतीय घटनेचा तू शिल्पकार आहेस’ ही त्यांची कॅसेट अत्यंत लोकप्रिय झाली.

वर्ष २००९ मध्ये प्रभाकर धाकडे आकाशवाणीतून निवृत्त झाले. ते शास्त्रीय असो किंवा सुगम संगीत फक्त संगीताप्रतीच ते पूर्णपणे समर्पित राहिले. १९८३ मध्ये त्यांना सूरसिंगार, मुंबईतर्फे ‘सूरमणी’ ही उपाधी प्राप्त झाली. त्याच वर्षी जपान येथे झालेल्या दिव्यांगांच्या संमेलनात त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. पुन्हा वर्ष १९९० मध्ये त्यांना ही संधी दुसऱ्यांदा मिळाली. स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गुरुजींच्या थोरल्या मुलाने मिलिंद धाकडे यांनी देखील मुंबईत चित्रपटसृष्टीत संगीतकार म्हणून नावलौकिक कमावला आहे. ‘वळू’, ‘विहीर’, ‘देऊळ’; तसेच ‘आजचा दिवस माझा’ या चित्रपटांना मंगेश धाकडे यांनी संगीत दिले होते. त्‍यांच्‍या मागे पत्नी ऊर्मिला, तीन मुले, सुना व नातू असा परिवार आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा