‘पठाण’च्या ट्रेलरला चाहत्यांकडून उदंड प्रतिसाद, दोन दिवसांतच यूट्युबवर जबरदस्त व्ह्युज

मुंबई, १२ जानेवारी २०२३ : चार वर्षांनंतर शाहरुख खानने बॉलिवूडमध्ये धमाकेदार एंट्री केली. पठाण चित्रपटातील गाणे आणि त्यातील वेशभूषेवरून जरी वाद झाले असतील तरीही चित्रपटाच्या ट्रेलरला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. शाहरूख खानच्या चाहत्यांकडून चित्रपटाच्या ट्रेलरला दाद मिळाली असून, चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढत जात आहे, असे मत चाहत्यांनी मांडले आहे.

या चित्रपटाचे प्रमोशनही मोठ्या प्रमाणात करण्यात आले. शाहरुख खानने फक्त उपस्थिती लावूनच नाही तर सोशल मीडियावरही चांगलेच प्रमोशन केले. मधल्या काळात ‘बेशरम रंग’ गाण्यावरून वाद झाला; परंतु तसे पाहायला गेले तर त्याचाही फायदा गाण्याला झालेला दिसून येतो. इंस्टाग्राम रिल्स आणि इतर समाजमाध्यमांद्वारे ‘बेशरम रंग’ हे गाणे हिट ठरले. तर सुप्रसिद्ध गायक अर्जित सिंग यांनी गायिलेले दुसरे गाणेही प्रेक्षकांच्या तेवढेच पसंतीस पडले. चित्रपटातील दोन्हीही गाणी समाजमाध्यमांवर तुफान व्हायरल झाली आणि आता पठाण चित्रपटाचा ट्रेलरने दोन दिवसांतच ३७ मिलियनपेक्षा अधिक व्ह्युज मिळवीत बाजी मारली. एवढेच नाही तर ट्रेलरने १.७ मिलियनपेक्षा अधिक लाईक्स मिळविले आहेत. या चित्रपटात शाहरुख खानसह दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम दिसणार आहेत. शाहरुख खानच्या विरुद्ध भूमिका जॉन अब्राहम साकारत असल्याने त्यांच्यामधील जुगलबंदी पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. तर ‘पठाण’नंतर शाहरुख खानचा ‘डंकी’ हा चित्रपट देखील प्रेक्षकांना पाहता येणार आहे. त्यामुळे २५ जानेवारीला ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर कसा धुमाकूळ घालणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा