भारत आणि चीन वादामध्ये आता अमेरिकेने घेतली उडी

वॉशिंग्टन, दि. २६ जून २०२० : भारत आणि चीन यांच्यामध्ये लडाख भागात सीमेवर सुरू असलेल्या वादावरून भारताचे आपले २० जवान शहीद झाले होते. या घटनेनंतर या वादाला वेगळे वळण मिळाले आहे. मागच्या एका दशकात बघितले तर चीनने आशिया खंडामध्ये आपला दबदबा वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. खास करून चीनच्या सभोवतालचे जे छोटे देश आहेत त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न चीन करत आहे. या भागात भारत देखील एक मोठी अर्थव्यवस्था आहे त्यामुळे भारताला देखील दबावाखाली आणण्याचा प्रयत्न चीन करत आहे. चीन करत असलेला हा प्रकार अमेरिकेच्या प्रभुत्वाला ठेच पोचणार आहे. त्यामुळे भारताच्या खांद्यावर बंदूक ठेवून अमेरिका चीनला लक्ष करण्याचा प्रयत्न करत आहे.

भारत आणि चीन यांच्यामध्ये सुरू असलेला तणाव एक संधी म्हणून वापर करून अमेरिकेने एक मोठी घोषणा केली आहे. अमेरिकेने युरोपमधून आपलं सैन्य काढून आशिया खंडात तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने जर्मनीमधून आपलं सैन्य माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. जर्मनीमध्ये तैनात असलेले अमेरिकेचे ९ हजार ५०० सैनिक अमेरिका आशिया खंडात तैनात करणार आहे.

जर्मन मार्शल फंडच्या ब्रुसेल्स फोरम २०२० मध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ म्हणाले की, “आम्ही अशा प्रकारे सैन्य तैनात करू की पीएलएचा आम्हाला सामना करता येईल. हे आमच्यासाठी एक मोठं आव्हान आहे आणि आम्ही त्यास सामोरे जाण्यासाठी सर्व संसाधनं उपलब्ध असल्याचं सुनिश्चित करू. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सूचनेनुसार सैन्याच्या तैनातीचा आढावा घेण्यात येत असून या योजनेंतर्गत अमेरिका जर्मनीमधील जवानांची संख्या ५२ हजार वरून २५ हजारांवर आणणार आहे,”

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा