अर्मेनिया आणि अझरबैजान मधील युद्ध अखेर संपुष्टात, ५ हजार लोकांनी गमावले प्राण

वॉशिंग्टन, २६ ऑक्टोबर २०२०: अर्मेनिया आणि अजरबैजानची लढाई २९ दिवसांपासून सुरू आहे. दोन्ही देशांनी २६ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून युद्धबंदीची अंमलबजावणी करण्यास सहमती दर्शविली. अमेरिकेच्या पुढाकाराने आर्मेनिया आणि अझरबैजान दरम्यान युद्धबंदी झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ यांनी याची घोषणा केली.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीट करून म्हटलं आहे की, “आर्मीनियाचे पंतप्रधान निकोलस पशिनन आणि अझरबैजानचे अध्यक्ष इलहम अलीयेव यांचे अभिनंदन, कारण त्यांनी मध्यरात्रीपासून युद्धविराम पालन करण्यास सहमती दर्शवली आहे. यामुळं अनेकांचे जीव वाचतील.” तत्पूर्वी माइक पोम्पीओ यांनी दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर युद्धबंदीची घोषणा केली.

महत्त्वाचं म्हणजे अर्मेनिया आणि अझरबैजान जगाच्या नकाशावरील लहान देश आहेत. परंतु, नागोर्नो काराबाख वरून दोन देशांमध्ये वाद चालू होते आणि त्यावरूनच गेल्या एक महिन्यापासून या दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू होते. या युद्धात आतापर्यंत दोन्ही बाजूचे सुमारे ५००० लोक ठार झाल्याचा दावा केला जात आहे. यामुळं या दोन देशातील युद्धानं प्रत्येकाचं लक्ष खेचून घेतलं होतं.

यापूर्वी, आर्मीनिया आणि अझरबैजान या दोन्ही देशांनी एकमेकांवर शांतता भंग केल्याचा आरोप केला होता. अर्मेनियानं अझरी सैन्यावर नागरी भागात बॉम्ब हल्ला केल्याचा आरोप केला. त्याचवेळी अझरबैजाननं हा आरोप फेटाळून लावला आणि ते म्हणाले की ते युद्धबंदीची अंमलबजावणी करण्यास तयार आहेत, पण प्रथम अर्मेनियाच्या सैन्यानं रणांगण सोडलं पाहिजे.

त्याचवेळी, नागोर्नो काराबाखच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी अझेरी सैन्यावर अस्केरेन आणि मार्टुनी भागातील वस्त्यांमध्ये आर्टिलरी फायरिंग केल्याचा आरोप केला आहे. त्याचवेळी अझरबैजाननं असा आरोप केला आहे की त्यांच्या जागेवर लहान शस्त्रे, मोर्टार, टँक आणि हॉविझटर्सनी हल्ला करण्यात आला आहे.

या युद्धात रशियन मध्यस्थीच्या माध्यमातून दोन युद्धविरामांचे प्रयत्न झाले आहेत, परंतु दोन्ही युद्धबंदी टिकली नाहीत आणि पुन्हा हा संघर्ष सुरू झाला. आता हे पहावे लागेल की अमेरिकेनं केलेल्या युद्धबंदीचा कालावधी किती दिवसांचा आहे. अर्मेनिया आणि अझरबैजान शांततेच्या मार्गावर परततील की काही दिवसांनंतर दोन्ही देश आमनेसामने असतील.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा