सततच्या पावसाने छोट्या टेकड्यांवरून वाहणाऱ्या पाण्याचे धबधबे आकर्षक दिसत आहेत

दौंड,१९ सप्टेंबर २०२० : राहूबेट परिसराला गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसाने ओढे-नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी उंचीने कमी असलेल्या डोंगराला देखील पाझर फुटल्याने पाणी वाहायला सुरुवात झाली आहे. परिणामी या पाझरणा-या पाण्याचे रुपांतर धबधब्यामध्ये झाले आहे.

हे धबधबे पाहण्यास आसपासच्या गावातील ग्रामस्थ येत आहेत.
राहू -दहिटणे (ता.दौंड) रस्त्यालगतच वनखात्याच्या हद्दीमध्ये असलेल्या वनात सटवाई ओढ्यानजीक पारंपारिक पद्धतीने खळखळून वाहणारा धबधबा पर्यटकांचे लक्ष वेधून घेत असून वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. वर्षाविहारासाठी प्रसिद्ध तसेच पर्यटकांची मांदियाळी असलेल्या माळशेज घाटात धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक जात असतात.

परंतु आपल्या परिसरात जर अशा स्वरुपाचे ठिकाण निर्माण झाले तर पर्यटकांसाठी जणू एक पर्वणीच म्हणावी लागेल. राहूबेट सध्या मागील काही दहा-पंधरा दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. पावसाच्या पाण्याने मुळा-मुठा आणि भीमा नद्या दुथडी भरुन वाहत असून ओढे-नाले त्याचबरोबर लहान मोठ्या डोंगर रांगातून देखील मोठ्या प्रमाणावर पाणी वाहू लागले आहे.

राहू गावापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या राहू-दहिटणे रस्त्यावरील सटवाई ओढ्यानजीक मुख्य रस्त्यालगतच पावसाच्या वाहत्या पाण्याच्या प्रवाहाच्या माध्यमातून खळखळून वाहणा -या धबधब्याची निर्मिती झाली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा