महाबळेश्वर, ४ डिसेंबर २०२२ : हैदराबाद येथील निजामाला भाडेपट्ट्याने दिलेल्या १५ एकर १५ गुंठे भूखंड व त्यावर बांधलेल्या आलिशान वूडलॉन हा बंगला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार महाबळेश्वर तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पोलिस बंदोबस्तात सील करण्यात आला आहे. या मिळकतीची बाजारभावानुसार किंमत २०० ते ३०० कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.
महाबळेश्वर शहरानजीक वूडलॉन ही मिळकत असून, या मिळकतीवरून वाद सुरू आहेत. दोन गटांमध्ये बरेच वाद झाल्याने जिल्हाधिकारी रुचेश जयंवशी यांनी तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील यांना वूडलॉन हा बंगला सील करण्याचे आदेश दिले होते. या कारवाईवेळी वाईचे तहसीलदार रणजितसिंह भोसले देखील उपस्थित होते.
ब्रिटिशांनी हा भूखंड भाडेपट्ट्याने पारशी वकील यांना दिला होता. १९५२ मध्ये हिज हायनेस नबाब मीरसाब उस्मान अल्लीखान बहादूर नबाब ऑफ हैदराबाद यांच्या नावे करण्यात आला. नबाब यांच्याकडे प्राप्तिकराची मोठी थकबाकी होती. २०१६ मध्ये या मिळकतीचे हस्तांतरण झाले व या मिळकतीवर दिलीप ठक्कर यांचे नाव लावण्यात आले.
तेव्हापासून ही मिळकत वादात होती. ठक्कर व नबाब यांच्यात वाद सुरू झाला. यानंंतर जिल्हाधिकारी यांनी हा बंगला सील करण्याचे आदेश महाबळेश्वर तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील यांना दिले. या आदेशानंतर बंगला सील करण्यात आला आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर