नीरेच्या अमेझॉन वितरण कार्यलयात चोरी; महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर चोरट्यांनी मारला डल्ला

नीरा, २३ सप्टेंबर २०२०: पुरंदर तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या नीरा शहरात अमेझॉन कंपनीचे वितरण कार्यलयाचे शटर उचकटून चोरी झाली आहे. अमेझॉन कंपनीकडून लोकांनी मागवलेले महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर चोरट्यांनी पहाटे डल्ला मारला आहे. सुमारे ७७ हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. नीरा पोलीसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नीरा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार नीरा शहराच्या बाहेर विरळ लोकवस्ती असलेल्या व नव्याने निर्माण होत असलेल्या सिटी मधिल एका व्यावसायिक गाळ्यात शुभम शशिकांत निगडे या युवकाची अमेझॉन कंपनीची डिलरशीप आहे. काल मंगळवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास अमेझॉन कंपनीचे ऑफिस बंद करुन चालक निगडे आपल्या मुळ गावी गुळूंचेला गेले होते. बुधवारी सकाळी नियमित वेळेत ऑफिस उघडण्यास आले असता ऑफिसचे शटर अर्ध्यावर उघडे दिसून आले. त्यांनी तात्काळ अमेझॉन मुख्य कार्यालयात व नंतर नीरा पोलीस दुरक्षेत्रात चोरी झाल्याची कल्पना दिली.

नीरा पोलीसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी ऑफिसमधील वस्तू मोठ्या प्रमाणावर अस्ताव्यस्त केलेल्या होत्या. ऑफिसचा वापरातील लॅपटॉप फोडून चिखलात टाकला होता. ऑफिसमधील सिसीटीव्हींचे नुकसान केले होते. सिसीटीव्हीचा डिव्हीआर ही चोरून नेला होता. ऑफिसमध्ये लोकांच्या ऑर्डरचे महागडे मोबाईल संच, इलेक्ट्रॉनिक वस्तू लंपास केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्या.
        ‌  
ऑफिसमधील महत्त्वाचा लॅपटॉपची नासधूस झाल्याने नक्की किती वस्तू चोरीला गेल्या आहेत हे सांगणे मुश्किल झाले आहे. सिसीटिव्हीचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान केले व सिसीटिव्हीचा आत्मा असलेला डिव्हिआरच चोरुन नेल्याने चोरीचे पुरावे ही नष्ट झाले आहेत. यामध्ये २१,४९८, / १७,४९९/ १३, ४८८, किमतीचे ३ मोबाईल, २,००० रुपये किंमतीचा डिव्हीआर व २३,०० रोकड असा सुमारे ७७ हजार ४९६ रुपये किंमतीचा ऐवज लंपास केल्याची तक्रार शुभम शशिकांत निगडे यांनी दिली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने व फौजदार विजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फोजदार सुरेश गायकवाड पुढील तपास करत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा