तर महाराष्ट्र पोलीस किती सक्षम आहेत हे कळेल – अनिल देशमुख

रायगड, २४ ऑगस्ट २०२०: सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणानंतर सेलिब्रटींपासून ते राजकारणापर्यंत चांगले हेवेदावे सुरू झाले होते. यानंतर महाराष्ट्र पोलीस आणि बिहार पोलीस यांच्यात देखील चांगलीच जुंपली होती. रिया चक्रवर्ती हिच्या विरोधात सुशांतचे वडील केके सिंग यांनी बिहारमध्ये एफआयआर नोंदवला होता. हा एफ आय आर मुंबई पोलिसांकडे सुपूर्द करावा अशी मागणी रिया चक्रवर्ती हिने केली होती. तसेच यानंतर ही चौकशी बिहार पोलिसांकडे रहावी की मुंबई पोलिसांकडे रहावी अशी चर्चा देखील सुरु झाली होती. यावर सुप्रीम कोर्टानं आपला निर्णय सुनावत सदर चौकशी सीबीआयकडे सोपवली आहे. या घटनेवरून आता महाराष्ट्र पोलिसांना कमी लेखण्याचं काम सुरू झालं आहे. यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलिस सक्षम असल्याचं सांगितलं आहे.

“महाराष्ट्र पोलिसांचं ट्रॅक रेकॉर्ड तपासा, आतापर्यंत ५८ राष्ट्रपती पुरस्कार मिळाले आहेत. बिहारला किती हे पाहिलं तर महाराष्ट्र पोलीस किती सक्षम आहेत हे कळेल,” असं मत अनिल देशमुख यांनी व्यक्त केलं. ते रायगड दौऱ्यादरम्यान पत्रकारांशी बोलत होते. यावेळी ते रायगडच्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी रोहा येथील बलात्कार व हत्याप्रकरणातील पीडितेच्या कुटुंबाची भेट घेऊन कुटुंबाची विचारपूस केली. या प्रकरणाविषयी त्यांनी यावेळी एक महत्त्वाची घोषणा देखील केली. ते म्हणाले की, याप्रकरणी ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक करणार आहे.

अनिल देशमुख म्हणाले, “महाराष्ट्र पोलीस अतिशय सक्षम आहे. अनेक वर्षांपासून त्यांची तुलना स्कॉटलंड पोलिसांशी केली जाते. त्यांचं ट्रॅक रेकॉर्ड पाहिलं तर महाराष्ट्र पोलिसांना सर्वाधिक ५८ राष्ट्रपती पुरस्कार मिळाले आहेत. त्यात तपासाबाबत महाराष्ट्राला १० पुरस्कार मिळाले आहेत. मला कोणत्याही राज्याची तुलना करायची नाही. पण बिहार पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस यांना त्यांच्या कामासाठी मिळालेल्या पुरस्कारांची माहिती घेतली तर महाराष्ट्र पोलीस किती सक्षम आहेत हे कळेल.”

पुढे ते म्हणाले की, “आम्ही जेव्हा सुशांत प्रकरण मुंबई पोलिसांकडे दिलं तेव्हा त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने याचा तपास केला. सर्वोच्च न्यायालयाने देखील मुंबई पोलिसांनी अतिशय चांगलं काम केल्याचं निरिक्षण नोंदवलं आहे. निकालपत्रात मुंबई पोलिसांनी योग्य तपास केल्याचं म्हटलं आहे. आता हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस सीबीआयला या प्रकरणात सर्व सहकार्य करेल. त्या पद्धतीने सहकार्य करण्याचं काम सुरु आहे.”

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा