कार्व्हर एव्हिएशन संस्थेला जाणिवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे – प्रमेश पारेख

बारामती, दि. २९ जून २०२०: शहरातील एम.आय.डी.सी येथील ‘कार्व्हर एव्हीएशन’ ही देशातील नामांकित विमान प्रशिक्षण देणारी संस्था आहे. महाराष्ट्रात मागील वीस वर्षांपासून कमर्शीयल पायलट या अभ्यासक्रमाचे शिक्षणाचे देणारे माहेरघर म्हणजे अकॅडमी ऑफ कार्व्हर एव्हिएशन या संस्थेला बदनाम करण्याचा काही लोकांकडून जाणिवपूर्वक प्रयत्न केला जात आहे.

भारतामधील विमान प्रशिक्षण संस्था या डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (D.G.C.A) यांच्या मान्यता प्राप्त असल्याने व निर्देशानुसार चालत असल्याने, सर्व नियमांचे पालन करणं हे प्रत्येक संस्थेवर बंधनकारक असते, क्वालिटी ट्रेनिंगच्या मार्फत चांगले पायलट घडवणे ही आमची जबाबदारी आहे.

सद्यस्थितीत भारतामध्ये अंदाजे २० ते २५ संस्था कार्यरत असून, महाराष्ट्रातील नावाजलेल्या ॲकॅडमी ऑफ कार्व्हर एव्हिएशन संस्थेचे नाव खराब करून अप्रत्यक्षरीत्या इतर संस्थांना त्याचा फायदा करून देणे हा उद्देश असल्याचे दिसून येत आहे. ॲकॅडमी ऑफ कार्व्हर एव्हिएशन या संस्थेने मागील वीस वर्षाच्या कालावधीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत देशातील एकूण व्यावसायिक पायलट पैकी १५ % टक्के म्हणजे पंधराशे (१५००) इतके व्यावसायिक पायलट आपल्या बारामतीच्या संस्थेने घडविले असुन सर्व पायलट भारतातील वेगवेगळ्या एअरलाइन्स कंपनीमध्ये मोठ्या पदावर उल्लेखनीय कामगिरी करत आहेत.

कार्व्हर एव्हीएशन संस्थेत प्रशिक्षण देत असताना प्रशिक्षकाने गैरवर्तणूक केल्याचा आरोप एका विद्यार्थिनीने केलेला आहे. घडलेल्या प्रकाराबाबत विद्यार्थिनीने संस्थेकडे केलेल्या तक्रारीनुसार या प्रकरणाबाबत चौकशी सुरु केलेली असताना, तक्रारदार विद्यार्थिनीने बारामती तालुका पोलीस स्टेशनकडे गुन्हा नोंदविलेला आहे. तरी वेगवेगळ्या सामाजिक संस्था संघटनांमार्फत दमदाटीची भाषा वापरून धमक्या देऊन संस्थेला वेठीस धरण्याचे, संस्थेच्या कर्मचाऱ्यांवर दहशत निर्माण करणे, तोडफोडीची भाषा वापरणे, खोट्यानाट्या बातम्या देऊन संस्थेचे नाव खराब करणे असे गैरप्रकार जाणिवपूर्वक काही मंडळी करीत आहेत.

हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना देखील वेगवेगळ्या पद्धतीने संस्थेला अडचणीत आणून बदनाम करण्याचे बेकायदेशीर कृत्य केले जात आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. नेमके याचवेळी संस्थेचे नाव जाणीवपूर्वक बदनाम करून, नवीन प्रवेश प्रक्रियेत अप्रत्यक्षरित्या अडथळा निर्माण करणे. नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश इतर संस्थेमध्ये कसे जातील यासाठी प्रयत्न करणे. तसेच सध्या प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची व पालकांची दिशाभूल करून संस्थेच्या विरोधात कट कारस्थान करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे कि काय? अशी शंका यामुळे निर्माण होऊ लागली आहे.

बारामती व अॅकॅडमीचे नाव बदनाम करण्याचा चंग काही व्यक्ती व संघटनांनी घेतली असल्याचे जाणवत आहे. सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्या अशा व्यक्ती संस्थांच्या विरोधात यापुढे कायदेशीर कारवाई केली जाणार असून त्याच्या विरोधात नुकसानभरपाईचा दावा दाखल करणार असल्याचे ‘कार्व्हर एव्हिएशन’ या संस्थेच्या वतीने सांगण्यात निवेदनाद्वारे सांगण्यात आले आहे. विद्यार्थिनीने केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन अकॅडमी ऑफ कार्व्हर एव्हिएशनने तक्रार ही संस्थेच्या मार्गदर्शक तत्वानुसार तसेच सुप्रीम कोर्टाच्या विशाखा गाईडलाईननुसार आय.सी.सी कमिटीला सुपूर्त करण्यात आलेली असून आय.सी.सी कमिटीने तक्रारीची गंभीर दखल घेऊन कायदेशीर कार्यवाही त्वरित सुरु केलेली आहे.

या सर्व बाबी न्यायप्रविष्ट असल्याने या न्यायिक प्रक्रियेमध्ये सर्व बाबींना सर्वतोपरी सहकार्य करणे ही संस्थेची प्राथमिक जबाबदारी असून, संस्था न्यायालयीन कामकाजामध्ये अथवा पोलिसांच्या तपासास संपूर्णपणे सहकार्य करीत आहे. यामध्ये संस्था कोणालाही पाठीशी घालणार नाही.
तपासाअंती दोषींवर संस्थेमार्फत देखील कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. परंतु न्यायिक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत संस्थेला यामध्ये काहीही करण्याचा अधिकार नाही याची जाणीव संस्थेविरोधात कारवाया करणाऱ्या व्यक्तींनी व संस्थेनी ठेवली पाहिजे असे संस्थेचे महाव्यवस्थापक प्रमेश पारीख यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा