मुंबई, १९ ऑगस्ट २०२२: कोरोना संपल्यानंतर राज्यामध्ये पहिल्याच वर्षी दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. त्याचबरोबर शनिवार आणि रविवार जोडून आलेल्या सुट्ट्या यामुळे वीकेंडचा बेत करून बाहेर पडणाऱ्यांची संख्या लक्षणीय असते. सलग सुट्ट्यांमुळे रस्त्यावर वाहतूक कोंडीची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. याचा विचार करूनच नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घ्यावी.
जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे अनेक जण बाहेर फिरायला जाण्याचे नियोजन करत असतात. त्याचबरोबर गणेशोत्सव तोंडावर असल्याने त्याच्या तयारीची ही नागरिकांमध्ये लगबग पाहायला मिळत आहे. या सर्व गोष्टींमुळे रस्त्यावर रहदारीचे प्रमाण वाढते व वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवतो. त्याचा फटकाही वाहतूक नियंत्रणावरती बसतो.
शहरामध्ये बहुतांश ठिकाणी दहीहंडीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो आहे. त्यामुळे शहरातील विविध भागातील वाहतूक व्यवस्थेच्या मार्गांमधून बदल करण्यात आलेला असतो. याचा फटका कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांना तसेच पर्यटकांना बसत असतो. त्यामुळे आपल्याला कुठे जायचे आहे त्याचे नियोजन करून पर्यायी मार्ग शोधण्याचाही प्रयत्न करून नागरिकांनी प्रवासाची काळजी घ्यावी.
मुंबईहून कोकणामध्ये आणि पुण्याकडे जाऊन विकेंड साजरा करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्याचबरोबर तोंडावर असलेला गणेशोत्सवाचा सण यामुळे मुंबई कोकण आणि मुंबई पुणे मार्गावरही वाहतूक कोंडीचा सामना पर्यटकांना करावा लागण्याची शक्यता आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर