मुंबई, ५ सप्टेंबर २०२०: अभिनेत्री कंगना सध्या आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चेत आहे. पाकव्याप्त काश्मीर सारखी मुंबई वाटत आहे असं विधान तीने केलं होतं. तसेच मुंबई पोलिसांविषयी देखील तीने वादग्रस्त विधान केलं होतं. यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि कंगना यांच्यात ट्विटर वॉर व हेवेदावे सुरू होते. यासंदर्भात सर्वच नेत्यांनी कंगनाला धारेवर घेतले होते. त्यानंतर आज संजय राऊत यांनी पुन्हा याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले की, कंगनाशी माझा कोणताही वैयक्तिक वाद नसून प्रश्न महाराष्ट्राच्या अस्मितेचा आहे असं त्यांनी स्पष्ट केलं.
संजय राऊत म्हणाले, “हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांचा आहे हे भान ठेवून बोलणं गरजेचं आहे. कंगना रनौतशी माझं व्यक्तिगत भांडण नाही. पण महाराष्ट्राचा अपमान करणारा कुणीही, कितीही मोठा असो खपवून घेणार नाही. भाजपचे नेते आशिष शेलार यांचीही भूमिकाही मी वाचली त्यांनी हे अधिक जोराने म्हटलं पाहिजे. महाराष्ट्र त्यांचा सुद्धा आहे. ते सुद्धा महाराष्ट्रात राजकारण करतात.”
संजय राऊत म्हणाले, “इतके दिवस महाराष्ट्रात राहता, मराठी वाचता येतं का? मराठी बोलता येतं का? माझ्या ट्वीटचा अर्थ समजून घेण्यासाठी स्वतःचं अकाऊंट स्वतः वापरावं लागतं. दुसऱ्या राजकीय पक्षाच्या आयटीसेलकडे ट्विटर अकाऊंट वापरायला द्यायचं नसतं. म्हणून असे घोळ होतात. काल कंगनाबाबत राज्याचे गृहमंत्री, परिवहन मंत्री यांनी भूमिका मांडली आहे. सरकारची भूमिका त्यातून स्पष्ट होते. मी सुद्धा पक्षाची भूमिका मांडली आहे. महाराष्ट्राचा अपमान करणारा कोणीही असो, त्या विरोधात आपण एकत्र आलं पाहिजे.”
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे