गोल पोस्ट महाराष्ट्र संजय राऊत यांना दिलासा नाहीच; जामीन अर्जावर ९ नोव्हेंबरला सुनावणी

संजय राऊत यांना दिलासा नाहीच; जामीन अर्जावर ९ नोव्हेंबरला सुनावणी

मुंबई, २ नोव्हेंबर २०२२: पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीच्या कोठडीत असणारे शिवसेना नेते संजय राऊतांना आज न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. राऊतांच्या जामिनासंदर्भात ईडीनं आज लेखी उत्तर सादर केलं. जामिनावरील निकाल न्यायालयानं राखून ठेवलाय.

मिळालेल्या माहितीनुसार, पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांनी जामीन मिळावा यासाठी, न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर आज सुनावणी पार पडली. राऊत यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली असून या प्रकरणाची पुढील सुनावणी ९ नोव्हेंबरला होणार आहे. त्यामुळं राऊत यांचा जेलमधील मुक्काम वाढलाय. यावेळी त्यांच्या भेटीसाठी शिवसेना नेते अनिल परब हे कोर्टात दाखल झाले होते.

नेमकं काय आहे पत्राचाळ घोटाळा प्रकरण ?

संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने ३१ जुलैला अटक केली. त्यानंतर संजय राऊत यांच्या विरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. ईडीच्या म्हणण्यानुसार, संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांची मे. गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी यांना कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते. मात्र, प्रविण राऊत यांच्या कंपनीने म्हाडा भाडेकरूंसाठी घरे न बांधताच ९ विकास कामांना ९०१ कोटींना एफएसआय विकला आणि मेडोज नावाचा प्रोजेक्ट सुरू केला. त्याच्या नावाखाली या कंपनीनं १३८ कोटी रूपये जमा केले होते. त्यानंतर म्हाडाच्या इंजिनिअरनं तक्रार केल्यानंतर या कंपनीची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक

error: Content is protected !!
Exit mobile version