मुंबई, २८ जुलै २०२०:कल्याण डोंबिवलीत गेल्या दोन महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत होता. मात्र सध्या केडीएमसीत धारावी पॅटर्न राबवला जात असल्याने रुग्णसंख्येत घट झाल्याचे काल केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले मात्र बकरी ईदच्या पार्श्वभुमीवर महानगरपालिकेने अधिक दक्षता घेतल्याचे दिसून येत आहे.
१८ जूनला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गुरांचा बाजार सुरू करण्याबात परवानगी पत्र जाहिर झाले होते. खरीप हंगामातील पशुधनाची खरेदी-विक्री सुद्धा सुरू झाली होती मात्र कृषि बाजार आवारात बकरी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे चित्र दिसून आले आणि सोशल डिस्टंसिंगचे तीन तेरा वाजले. तसेच नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. म्हणून महानगरपालिकेने बैलबाजार हॉटस्पॉट क्षेत्रात येत असल्याने सदर परवानगी पुढील आदेश येईपर्यंत रद्द केली आहे.
बकरी ईद बाबत शासनाने दिलेल्या सूचनांप्रमाणे जनावरांचे बाजार बंद राहतील. त्यामुळे नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने अथवा दूरध्वनी संपर्कातून जनावरे खरेदी करावी जेणेकरून नियमांचे पालन होईल. तसेच कोरोना परिस्थिती पाहता बकरी ईद निमित्त कोणतीही शिथिलता देता येणार नाही, असे आदेश महानगरपालिका आयुक्त .डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.
कोरोनाचे संकट पाहून प्रत्येकाने नियम पाळून ईद घरात राहून साजरी करण्याचे सांगितले आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने आपल्या कडून नियमांचे उल्लघन होऊ नये याची दक्षता घ्यावी असे ही या वेळेस सांगणयात आले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : राजश्री वाघमारे