बारामतीत १९६ निवासी सदनिका होणार

बारामती, १ सप्टेंबर २०२०: वालचंदनगर पोलिस ठाण्याला नवी इमारत बारामती उपविभागातील पोलिस कर्मचा-यांच्या निवासस्थानाचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून हा प्रश्न मार्गी लागतो आहे. बारामतीत १९६ सदनिकांचे बांधकाम केले जाणार असल्याची माहिती अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते यांनी दिली.
याशिवाय वालचंदनगर पोलिस ठाण्यासाठी स्वतंत्र दिमाखदार इमारत उभी राहणार आहे. या दोन्ही कामांसाठी ४५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. याप्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अौदुंबर पाटील उपस्थित होते.
मोहिते म्हणाले, बारामतीत उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाशेजारी सध्या पोलिस लाईन आहे. या ठिकाणची निवासस्थाने जुन्या पद्धतीची आहेत. शिवाय कमी प्रमाणात निवासस्थानांची व्यवस्था उपलब्ध होती. त्यामुळे पोलिस कर्मचा-यांसाठी ४ इमारतीत १९६ सदनिका उभ्या केल्या जाणार आहेत. दोन बेडरुम, एक किचन, हाॅल व शौचालय, स्नानगृहासह ५०१ स्क्वेअर फूटांची एक सदनिका असेल. सात मजली इमारत येथे उभी राहणार आहे.
या कामासाठी पोलिस लाईनमध्ये सध्या राहत असलेल्या पोलिस कर्मचा-यांना बाहेर भाडेकरू म्हणून काही दिवस राहावे लागणार आहे. या कालावधीतील भाडे त्यांना दिले जाणार आहे. पुढील दोन वर्षात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. राज्य पोलिस गृहनिर्माण विभागाकडून हे काम केले जाणार आहे.
वालचंदनगर पोलिस ठाण्याला नवी इमारत
वालचंदनगर पोलिस ठाण्यासाठी नवी इमारत बांधण्यात येणार आहे. सध्या पोलिस ठाणे कार्यरत असलेली इमारत जुनी आहे. त्या पाठीमागे शेती महामंडळाची पाच एकर जागा घेण्यात आली आहे. तेथे पोलिस ठाण्यासह अधिका-यांसाठी चार निवासस्थाने तसेच परेड ग्राऊंडची व्यवस्था केली जाणार आहे. बगीचा तसेच अोपन जीम या ठिकाणी असेल. या दोन्ही कामांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या असल्याचेही मोहिते यांनी सांगितले.
बारामती शहर पोलिस ठाणे, अप्पर अधिक्षक कार्यालय एकाच जागी अप्पर पोलिस अधिक्षक कार्यालय, शहर पोलिस ठाणे व वाहतूक शाखेसाठी येथील प्रशासकिय भवनासमोरील कवी मोरोपंत नाट्यगृहाशेजारील जागा निश्चित करण्यात आली आहे. साडे तीन एकर जागेवर ही तिन्ही कार्यालये होणार असून सुमारे १५ कोटी रुपयांचे हे काम प्रस्तावित असल्याचेही मोहिते यांनी सांगितले.
बारामतीत अधिका-यांसाठी स्वतंत्र रो-हाऊसेस
पोलिस कर्मचा-यांच्या वसाहतीचा प्रश्न निकाली निघताच बारामती शहर व तालुका पोलिस ठाण्यात कार्यरत अधिकाऱयांसाठी बारामतीत रो-हाऊसच्या धर्तीवर निवासस्थाने उभी केली जाणार आहेत. परंतु, सध्या कर्मचा-यांच्या निवासस्थानाचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावला जात असल्याचे मोहिते यांनी सांगितले.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा