नागपूर, १२ नोव्हेंबर २०२०: यंदाच्या पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी आधीपासूनच त्रस्त आहे. मात्र, यंदाच्या हिवाळी हंगामामध्ये शेतकऱ्यांसाठी सरकारनं एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यानंतर आता रब्बी हंगामासाठी राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसाही वीज देण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरु आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी ही माहिती दिली. आम्ही राज्यात रब्बी हंगामात शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज देण्याचा विचार करत आहोत. याबाबतचा निर्णय अंतिम झाल्यास सिंचनासाठी अखंडित वीज देण्याच्या सूचना मुख्य अभियंत्यांना देण्यात येतील. कोरोनाच्या संकटानंतर राज्यातील वीजेची मागणी वाढली असली तरी पुरेसा वीजपुरवठा होईल, अशी ग्वाही उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली.
नुकसान भरपाई चे पैसे खात्यात होणार जमा
निवडणूक आयोगानं परवानगी दिल्यानंतर अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा राज्य सरकारचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानुसार आता येत्या शनिवारपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार आहे.
जून ते ऑक्टोबरदरम्यान नुकसान झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारकडून २९४ कोटी ८१ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील जवळपास पाच लाख पूरग्रस्त शेतकऱ्यांची खातेनिहाय यादी तयार करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांच्या खात्यात शनिवारपर्यंत पैसे जमा होतील.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे