भारतातील ‘ही’ १० राज्य महिलांच्या सुरक्षेसाठी धोकादायक…

पुणे, ४ ऑक्टोंबर २०२०: उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यात झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर १९ वर्षीय युवतीच्या मृत्यूबद्दल देशभरात संताप आहे. देशातील बलात्कार प्रकरणातील आरोपींना जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी तसेच महिलांना किंवा मुलींना अधिकाधिक सुरक्षा मिळावी यासाठी देशभरातून मागणी केली जातेय. अशा परिस्थितीत नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या (एनसीआरबी) आकडेवारीवरून असं दिसून आलं आहे की, २०१२ मध्ये निर्भया सामूहिक बलात्कार-हत्येच्या घटनेनंतर भारताला हादरवून टाकलं होतं, प्रत्यक्षात देशात बलात्काराच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढत चाललं आहे.

२०१९ मध्ये देशातील एकूण प्रकरणांपैकी दोन तृतीयांशपेक्षा जास्त प्रकरणं १० राज्यांमधून नोंदली गेली आहेत. या १० राज्यात उत्तर प्रदेश ते राजस्थान आणि मध्य प्रदेश ते केरळ यासारख्या राज्यांचा समावेश आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत गेल्या १० वर्षांत या राज्यांमध्ये परिस्थिती अधिक बिकट बनली आहे.

भारतात बलात्कार एक साथीचा रोग

एनसीआरबीच्या ताज्या उपलब्ध आकडेवारीवरून असं दिसून आलं आहे की, भारतातील बलात्काराच्या एकूण मधील पाच बलात्कार पीडितंपैकी चार या दहा राज्यांतील आहेत – राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, केरळ, आसाम, हरियाणा, झारखंड, ओडिशा आणि दिल्ली.

गेल्या १० वर्षांत या १० राज्यात बलात्काराच्या एकूण घटनांची संख्या जवळजवळ दुप्पट झाली आहे – २००९ मध्ये १२,७७२ वरून २०१९ मध्ये २३,१७३ झाली आहे. देशातील उर्वरित २६ राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये गेल्या १० वर्षांत बलात्काराच्या घटनांमध्ये काही विशेष बदल झालेला नाही.

गेल्या दहा वर्षांत भारतातील महिलांवरील बलात्काराचं प्रमाण सरासरीपेक्षा चारपट वाढलं आहे. २००९ मध्ये, वरील दहा राज्यांमध्ये दररोज सुमारे तीन महिलांवर बलात्काराच्या घटना घडल्या. २०१९ मध्ये या १० राज्यांमधील हा आकडा तीनवरून ११ पर्यंत वाढला.

महिलांसाठी असुरक्षित

राजस्थानमध्ये गेल्या दहा वर्षांत बलात्काराच्या घटनांमध्ये २९५ टक्के वाढ झाली आहे. देशातील कोणत्याही राज्याच्या तुलनेत ही सर्वात वाईट परिस्थिती आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार २००९ मध्ये राजस्थानमध्ये बलात्काराच्या १,५१९ घटनांची नोंद झाली. २०१९ मध्ये ही आकडेवारी ५,९९७ घटनांपर्यंत वाढली.

या यादीमध्ये केरळ दुसर्‍या क्रमांकावर सर्वात खराब प्रदर्शन करणारं राज्य आहे. केरळमध्ये गेल्या दहा वर्षांत बलात्काराच्या घटनांमध्ये २५६% वाढ झाली आहे. २००९ मध्ये केरळमध्ये बलात्काराच्या ५६८ घटना नोंदविण्यात आल्या आणि त्यात २०१९ मध्ये १,४५५ नी वाढ होऊन २,०२३ झाली.

महिलांसाठी तिसरे सर्वात असुरक्षित राज्य म्हणजे दिल्ली. गेल्या दहा वर्षांत देशाची राजधानी दिल्लीत बलात्काराच्या घटनांमध्ये १६७% म्हणजे तीन पट वाढ झाली आहे. २००९ मध्ये दिल्लीमध्ये बलात्काराच्या ४६९ घटनांच्या तुलनेत २०१९ मध्ये १,२५३ एवढ्या घटना नोंदविण्यात आल्या.

दिल्ली शेजारील हरियाणा राज्यात गेल्या दहा वर्षांत बलात्काराच्या घटनांची संख्या दुपटीने वाढली आहे. या कालावधीत राज्यात बलात्काराच्या घटनांमध्ये १४५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २००९ मध्ये हरियाणामध्ये बलात्काराच्या ६०३ घटना नोंदविण्यात आल्या आणि २०१९ मध्ये या घटना १,४८० पर्यंत वाढल्या. त्याचप्रमाणं झारखंडमध्ये दहा वर्षांत बलात्काराच्या घटनांमध्ये ९७% वाढ झाली आहे. २००९ मध्ये बलात्काराच्या ७१९ घटना नोंदवल्या गेल्या, ज्या २०१९ मध्ये १,४१६ पर्यंत वाढल्या.

हाथरसच्या घटनेमुळं सध्या उत्तर प्रदेश हे राज्य चर्चेत आहे. या प्रकरणात अतिशय वाईट वागणूक केल्याबद्दल राज्य प्रशासनावर कडक टीका होत आहे. सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्यात गेल्या दहा वर्षांत बलात्काराच्या घटनांमध्ये जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. २००९ मधील १,७५९ बलात्काराच्या घटनांच्या तुलनेत राज्यात २०१९ मध्ये राज्यात ३,०६५ घटना नोंदविण्यात आल्या.

या १० राज्यात मध्य प्रदेश हे एकमेव असे राज्य आहे जेथे बलात्काराच्या घटनांमध्ये १७ टक्के घट झाली आहे. २०१३ ते २०१८ या काळात मध्य प्रदेशात दरवर्षी ४,००० हून अधिक बलात्काराच्या घटना नोंदवल्या गेल्या. २०१९ मध्ये राज्यात २,४८५ बलात्काराच्या घटना घडल्या. अन्य राज्यात महाराष्ट्र, ओडिशा आणि आसाममध्ये गेल्या दहा वर्षांत बलात्काराच्या घटनांमध्ये अनुक्रमे ५५, ३५ आणि ९ टक्के वाढ झाली आहे.

निर्भया प्रकरणाच्या ७ वर्षानंतर

२०१२ च्या दिल्ली सामूहिक बलात्कार-हत्या प्रकरणानंतर राजस्थान, केरळ, हरियाणा आणि झारखंडमध्ये बलात्काराच्या घटनांमध्ये गेल्या सात वर्षांत ८३ टक्के, ६६ टक्के, ५२ टक्के आणि १८ टक्के अधिक नोंद झाली असल्याचं एनसीआरबी’च्या आकडेवारीवरून दिसून आलं आहे.

गेल्या दहा वर्षांत या दहा राज्यांमध्ये सरासरी २३,१७३ बलात्काराच्या घटना घडल्या असून ज्यामध्ये ३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुसरीकडं, इतर २६ राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये बलात्काराच्या घटनांमध्ये २१ टक्क्यांनी घट घट होऊन ११,१७३ वरून ८,८६० घटनांवर पोहोचली आहे.

निर्भया प्रकरणानंतर सरकारनं कठोर कायदे लागू केले होते. त्या प्रकरणानंतरच्या आकडेवारीवरून असं दिसून आलं आहे की, या कायद्यांचा गुन्हेगारांवर कोणताही परिणाम दिसून आला नाही, या कायद्यांमुळं गुन्हेगारांवर वचक बसेल असं समजलं जात होतं परंतु झालं त्याच्या उलट. काही राज्यांमध्ये कायद्याच्या अंमलबजावणीतील त्रुटींमुळं बलात्काराच्या अधिक घटनांची नोंद झाली. हाथरसमध्ये घडलेल्या घटनांनी देश पुन्हा एकदा हादरवून टाकला आहे. अशा परिस्थितीत कायद्याचे काटेकोरपणे पालन करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा