नवी दिल्ली, २५ एप्रिल २०२१: काही दिवसांपूर्वीच सिरम इन्स्टिट्युटने कोविशील्ड लसीचे सुधारित दर जाहीर केले होते. या लसीच्या सुधारित दारपत्रकानुसार, कोविशील्डचे डोस खाजगी रुग्णालयांना ६०० रुपयांत, राज्य सरकारांना ४०० रुपयांत आणि केंद्र सरकारला आधीप्रमाणेच १५० रुपयांत मिळणार आहेत. याबरोबरच आता भारत बायोटेक ने देखील आपले सुधारित दर जाहीर केले आहेत. भारत बायोटेक स्वदेशी लस कोव्हॅक्सिन चे उत्पादन करते. ही लस राज्य सरकारांना ६०० रुपयांत तर खाजगी रुग्णालयांना १२०० रुपयांत मिळणार आहे. भारत बायोटेकने काल लसीच्या नव्या दरांची घोषणा केली आहे. कंपनीने लसीचा निर्यात दर १५ ते २० डॉलर इतका निश्चित केला आहे.
कंपनीने जुलैपासून प्रत्येक महिन्याला ५ कोटी ३५ लाख डोस तयार करण्याचे पाऊल टाकले आहे. कंपनी इनएक्टिवेटेड लस बनवते. अशा प्रकारची लस सुरक्षित असते. या प्रकारची लस सुरक्षित आहे, परंतु यात बरीच गुंतागुंत आहे. ही तयार करणे देखील महाग आहे. कोव्हॅक्सिन ही लस भारत बायोटेक आणि इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (ICMR) प्रयत्नांतून विकसित झालेली स्वदेशी लस आहे. ही लस सध्या जगातील सर्वाधिक यशस्वी लसींच्या यादीत सामील झाली आहे. लसीचा क्लिनिकल प्रभावीपणा ७८ टक्के आहे, असा दावा कंपनीने फेज-३ क्लीनिकल ट्रायल्सच्या दुसऱ्या टप्प्यातील निष्कर्षांच्या आधारे केला आहे. म्हणजेच ही लस कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात ७८ टक्के प्रभावी आहे.
भारत बायोटेकने अलीकडेच कोवॅक्सिन लसीचे उत्पादन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. आता प्रत्येक वर्षी लसीचे जवळपास ७० कोटी डोस तयार करण्याचे उद्दिष्ट कंपनीने निर्धारित केले आहे. कंपनीने आपल्या हैदराबाद आणि बंगळुरूतील काही प्लांटची क्षमता वाढवली आहे. कमाल मर्यादेपर्यंत लसीचे उत्पादन पोचवण्यासाठी २ महिन्यांचा अवधी लागणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे