अभिनेत्रीच्या घरी जाऊन तिला सुरक्षा देतात, हाथरस प्रकरणात गप्प का?: संजय राऊत

मुंबई, ३० सप्टेंबर २०२०: हाथरस बलात्कार प्रकरणावरून सध्या संपूर्ण देशभरात संतापाची लाट पसरलीय. उत्तर प्रदेश मधील हाथरस जिल्ह्यातील एका १९ वर्षीय दलित युवतीवर सामूहिक बलात्कार झाला होता. बलात्कार करून नराधमांनी तिला मारहाण देखील केली होती. तब्बल नऊ दिवसांनी शुद्धीवर आल्यावर तिनं झालेला प्रकार सांगितला होता. यानंतर तिचा दिल्लीमध्ये सफदरजंग रुग्णालयात मृत्यू झाला. यात आणखीन भर म्हणजे उत्तर प्रदेश पोलिसांनी या पीडितेचा परस्पर अंतिम संस्कार केला. ज्यामुळं तिच्या कुटुंबियांमध्ये देखील असंतोष निर्माण झालाय. हे सर्व होऊन देखील एका अभिनेत्रीला तिच्या वक्तव्यासाठी बचाव करत अनेक नेते मंडळी समोर आले होते. मात्र, या प्रकरणात हे नेते मंडळी गप्प आहेत, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

त्यांनी ही टीका रिपाईचे नेते रामदास आठवले यांच्यावर केली. ते म्हणाले की, “उत्तरप्रदेशात घडलेली ही घटना दुर्देवी आणि धक्कादायक आहे. तिच्याविषयी मला कुठंही ट्विटरवर किंवा मीडियात आंदोलन छेडलेलं दिसत नाही. रिपाईचे नेते रामदास आठवले कुठे आहेत, एखाद्या अभिनेत्रीच्या घरी जाऊन तिला सुरक्षा देतात, मात्र अनुसूचित जमातीतील एका मुलीवर झालेल्या अत्याचाराप्रकरणी काहीही बोलत नाही.”

“एखाद्या गरीब मुलीला न्याय मिळू नये का? त्यासाठी एखादी अभिनेत्री किंवा एखादा सेलिब्रेटी हवा का? हाथरसमधील ती निर्भया आमची कोणी लागत नाही का?” असंही सवाल संजय राऊतांनी विचारलं.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्यांनी युपीबाबत ती मागणी करावी

“हाथरस बलात्कार घटनेप्रकरणी मला कुठेही ट्वीटवर किंवा मीडियात आंदोलन छेडलेलं दिसत नाही. रामदास आठवले कुठं आहेत. अभिनेत्रीच्या घरी जाऊन तिला सुरक्षा देत होते, त्यांचे कार्यकर्ते स्वागतासाठी गेले होते. काल राजभवनात गेले होते. या देशातील एकेकाळी लढणारी खंबीर अनुसूचित जमातीतील चळवळ आज निस्तेज होताना दिसत आहे.”

“अनुसूचित जमातीतील मुलीवर अत्याचार होतात आणि कोणीही लढत नाही. काहीही बोलत नाही. आम्ही शांतपणे याकडे पाहतोय. जेव्हा संधी मिळेल तेव्हा आवाज उठवू. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्यांनी आता युपीबाबत ती मागणी करावी,” असा टोलाही संजय राऊतांनी लगावला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा