तळेगाव दाभाडे येथे चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न, गृहिणीच्या सतर्कतेमुळे उधळला डाव

पुणे, २६ ऑक्टोबर २०२२ : पुणे जिल्ह्यात तळेगाव दाभाडे येथील एका कॉलनीतील घरामध्ये शिरुन पाच चोरट्यांनी चोरीचा कट आखला होता. परंतु कपाट वाजल्याने घरातील महिला जागी झाली. महिलेने आवाजाच्या दिशेने धाऊन जात चोरट्यांचा पाठलाग केला. एवढ्यात चोरट्यांनी तिथून पळ काढला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यामुळे गृहिणीच्या सतर्कतेमुळे ऐन दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी चोरीचा डाव उधळला आहे.

पुणे जिल्ह्यात मावळमधील तळेगाव दाभाडे येथे कडोलकर कॉलनी आहे. या कॉलनीत धनंजय वाडेकर आपल्या कुटुंबासह राहतात. दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चोरटे चोरी करण्याच्या इराद्याने वाडेकर यांच्या घरामध्ये शिरले. परंतु यावेळी झालेल्या कपाट्या आवाजामुळे चोरीचा डाव उधळला.

यावेळी एकूण पाच चोर वाडेकर यांच्या घरात शिरले होते. चोरांनी कपाट उघडण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी कपाटाच्या आवाजाने धनंजय वाडेकर यांच्या पत्नीला जाग आली. त्यांनी कपाटाचा आवाजा ज्या दिशेने आला, त्या दिशेने त्या आवाज करत पुढे गेल्या. चोर दिसताच त्यानी पाठलाग केला. परंतु चोरट्यांनी तिथून पळ काढला.

दरम्यान, या घटनेची माहिती तळेगाव दाभाडे पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरु केला आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत. ही घटना उघडकीस आल्यावर परिसरातील इतर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा