जिल्हा बँकेची वाळकी शाखा चोरट्यांनी फोडली; मात्र सायरन वाजल्याने फसला लुटीचा डाव

वाळकी (जि. अहमदनगर), २८ जानेवारी २०२३ : रात्रभर वीजपुरवठा खंडित झाल्याचा आणि अवकाळी पावसाचा फायदा घेत चोरट्यांनी चक्क वाळकी येथील अमहदनगर जिल्हा सहकारी बँकेची शाखा फोडली; मात्र बँकेची मजबूत असलेली तिजोरी अन् धोक्याची सूचना देणारा सायरन वाजल्याने चोरट्यांचा डाव फसला. दरम्यान, तिजोरीत असलेली पन्नास लाखांची रक्कम सुरक्षित राहिली.

चोरट्यांनी वाळकी येथील बँकेची शाखा फोडण्याचा प्रकार दुसर्‍यांदा घडल्याने वाळकी परिसरात खळबळ उडाली. बँकेचे शाखाधिकारी किसन गोपीनाथ सातपुते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगर तालुक्यातील वाळकी येथे रात्री अकराच्या दरम्यान वीज गेल्याने आणि अवकाळी पावसानेही हजेरी लावल्याने या परिसरात सामसूम होती. या दोन्ही बाबींचा फायदा घेत चोरट्यांनी बँकेच्या समोरील लोखंडी गेटचे कुलूप तोडून आतील शटरला असलेले मजबूत लॉक कटावणीच्या साह्याने उचकटून बँकेत प्रवेश केला. आतमध्ये शाखाधिकारी यांच्या केबिनमध्ये असणारी तिजोरी फोडण्याचा प्रयत्न करताच धोक्याची सूचना देणारा सायरन वाजल्याने चोरट्यांनी तेथून काढता पाय घेतला.

पोलिसांना माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक युवराज चव्हाण यांच्यासह पोलिस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथकास बोलाविण्यात आले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यात तीन-चारजण पंचवीस वयोगटातील असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा