चोरट्यांनी वळवला टोमॅटोकडे मोर्चा, कोल्हापूर जिल्यात ५० हजारांच्या टोमॅटोंवर चोरट्यांनी मारला डल्ला

कोल्हापूर,२९ जुलै २०२३ : दोन महिन्यांपूर्वी कवडीमोल भावाने विकल्या जाणाऱ्या टोमॅटोला आता सोन्याचा भाव आला आहे. लांबलेला मान्सून आणि वातावरणातील बदलामुळे टोमॅटो उत्पादनावर याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे बाजारभावही गगनाला भिडले आहेत. याचा परिणाम संपूर्ण देशभर दिसून येत आहे. या अगोदर मौल्यवान वस्तूंच्या चोऱ्या होत होत्या. परंतु आता टोमॅटोला आलेल्या सोन्याच्या भावामुळे चोरट्यांनी आपला मोर्चा टोमॅटोकडे वळवला आहे.

सध्या टोमॅटोला चांगला भाव आला आहे. त्यामुळे अनेकांच्या ताटातून आता टोमॅटोच गायब झाला आहे. तर टोमॅटो महाग होण्यावर सोशल मीडियात अनेक रिल्स सध्या धुमाकूळ घालत आहेत. लाल टोमॅटोला आता सोन्याचा भाव आल्याचे दिसत आहे, कारण टोमॅटोचे भाव १०० ते १२० रूपयांवरून थेट २०० च्या घरात गेले आहेत.

चार एक दिवसांपुर्वीच गोंदिया मध्ये टोमॅटो चोरीची घटना समोर आली होती. तर आंध्र प्रदेशात टोमॅटो पिकांच्या राखणीसाठी गेलेल्या दोन शेतकऱ्यांची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. त्यापाठोपाठ आता कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड येथील टोमॅटोची चोरी झाल्याचे समोर आले आहे. शेतकरी अशोक मस्के यांच्या शेतात ही चोरी झाली आहे. विशेष म्हणजे सीसीटीव्ही असतानाही चोरी करण्यात आली आहे. शेतातील ५० हजारांच्या टोमॅटोंवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. चोरट्यांनी ५० हजार किंमतीचे २५ कॅरेट टोमॅटो तोडून नेली आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा