मुंबईकरांना तिसऱ्या लाटेचा धोका ? इमारत सील होणार, कुणालाही प्रवेश नाही

मुंबई, ३१ ऑगस्ट २०२१: मुंबईला करोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेत मुंबई महानगरपालिका सावध झाली असून ही लाट थोपवून धरण्यासाठी महापालिकेने आपला कठोर नियमांचा ‘अॅक्शन प्लान’ तयार केला आहे. यावेळी नियमांची कडक अंमलबजावणी केली जाणार असून सील केलेल्या इमारतींवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. अशा इमारतींमधील रहिवाशांना बाहेर पडण्यास मनाई करण्यात येणार आहे. तसेच बाहेरील व्यक्तींना देखील इमारतीत प्रवेश करण्याला मनाई करण्यात येणार आहे.
 आयुक्तांनी याबाबत आज नवीन मार्गदर्शक तत्वे जारी करत प्रशासनाला नियम अंमलबजावणीसाठी सक्त निर्देश दिले आहेत. आता मास्क लावण्याच्या नियमावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. मास्क न लावणाऱ्यांवर अधिक कठोर दंडात्मक कारवाई करण्यात यावी असे स्पष्ट निर्देशच आयुक्त चहल यांनी सर्व २४ प्रशासकीय विभागांना दिले आहेत. या अनुषंगाने आवश्यक तेवढ्या अधिक ‘क्लीन-अप मार्शल’ची तात्पुरती नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुंबई पोलीसांद्वारे करण्यात येत असलेली ‘विना मास्क’ विषयक कारवाई देखील अधिक तीव्र करण्याच्या सूचना देखील आयुक्तांनी मुंबई पोलीस दलास दिल्या आहेत. या अनुषंगाने मनपा क्षेत्रात दररोज अधिकाधिक व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करणे गरजेचे असल्याची सूचना देण्यात आल्या आहेत.
सील इमारतींबाबत निर्देश
ज्या इमारती सील करण्यात येतील, अशा इमारतींमध्ये प्रवेश करण्यास कोणालाही अनुमती असणार नाही. तसेच इमारतींमध्ये असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला बाहेर पडण्यास मनाई असणार आहे. त्याचबरोबर अशा इमारतींमध्ये विविध कामांसाठी येणारे कामगार, वाहन चालक यांना देखील सदर कालावधी दरम्यान इमारतीमध्ये प्रवेश असणार नाही. इमारत सील करण्याविषयीची प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविली जावी यासाठी सर्व सील इमारतींच्या गेटवर पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा