नवी दिल्ली, १८ डिसेंबर २०२०: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कृषी कायद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. यादरम्यान त्यांनी नवीन कृषी कायदा छापलेला कागद फाडून आपला निषेध नोंदवला. ते म्हणाले की सरकार अजून किती शेतकऱ्यांचा जीव घेणार आहे? आतापर्यंत या शेतकरी आंदोलनामध्ये २० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला आहे. एक एक शेतकरी भगतसिंग होऊन या आंदोलनात सहभागी झाला आहे. तर दुसरीकडं सरकार इंग्रज प्रमाणे वागणूक देत आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, योगी आदित्यनाथ यांनी बरेली मध्ये रॅली केली आणि शेतकऱ्यांना नवीन कृषी कायद्याविषयी पटवून देताना तुमची जमीन कुठेही जाणार नाही किंवा बाजार देखील बंद होणार नाही असे सांगितले. भाजपवाल्यांनी हे सांगावे की या कायद्या पासून शेतकऱ्यांना कोणता फायदा आहे? भाजप वाल्यांना केवळ एकच गोष्ट तोंडपाठ करून दिले गेले आहे की, या नवीन कायद्यामुळे शेतकरी देशात कोठेही आपले उत्पादन विकू शकेल. केवळ हवेत बाता मारल्याने काय साध्य होणार आहे? शेतकऱ्यांना नव्हे तर भाजप नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना भ्रमित केले गेले आहे. भाजप नेत्यांना व कार्यकर्त्यांना या बाबत जनू अफू देण्यात आली आहे.
कोरोना काळात अध्यादेश का काढला ?
अरविंद केजरीवाल म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयातील आमच्या वकिलांनी केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे. कोरोना काळात सरकारने अध्यादेश का काढला? पहिल्यांदा राज्यसभेत मतदानाविना ३ कायदे कसे पास झाले? हे कायदे भाजपच्या निवडणुकीसाठी निधी म्हणून बनविण्यात आले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, दिल्ली विधानसभा केंद्राच्या कृषी कायद्यांना नकार देत आहे, केंद्र सरकार ब्रिटीशांपेक्षा वाईट होण्याचा प्रयत्न करू नये आणि कायदा मागे घ्यावा. दिल्ली विधानसभेत कृषी कायदे रद्द करण्यासाठी ठराव पत्र स्वीकारण्यात आले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे