मुंबई, 21 फेब्रुवारी 2022: तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (KCR) मुंबई दौऱ्यावर आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी रविवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे आणि केसीआर यांनी ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. भारतीय जनता पक्षावर (भाजप) हल्लाबोल करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आमचं हिंदुत्व बदला घेण्याचं नाही.
मुख्यमंत्री आणि पंतप्रधान येतील आणि जातील पण देश कायम राहील, असं उद्धव ठाकरे म्हणाले. अशा स्थितीत राष्ट्राचे भवितव्य काय? कोणीतरी पुढाकार घेणं आवश्यक होतं आणि आम्ही ते केलं. खूप दिवसांपासून भेटायचं होतं आणि शेवटी भेटलो. ही बैठक चांगली झाली. ही केवळ सुरुवात असल्याचं ते म्हणाले. केंद्रीय संस्थांचा गैरवापर झाला आहे. ममता बॅनर्जी यांचीही भेट घेणार आहोत. या प्रयत्नाला वेळ लागेल आणि त्यासाठी कठोर परिश्रमही घ्यावे लागतील, असं उद्धव ठाकरे म्हणाले. खोट्याचा व्यापार करणं आणि दुसऱ्याला दोष देणं योग्य नाही. आज हेच होत आहे.
त्याचवेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी उद्धव यांची भेट घेतल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि आम्ही अनेक मुद्द्यांवर बोललो, असं सांगितलं. आम्ही विकासाचा वेग वाढवणं आणि धोरण बदलण्याबाबतही बोललो आहोत. आमच्यात राजकीय चर्चाही झाली. ते म्हणाले की, काही दिवसांत आपण सर्वजण हैदराबाद किंवा इतरत्र भेटू. महाराष्ट्राच्या सहकार्यानं तेलंगणात चांगले प्रकल्प आहेत. भविष्यातही आम्ही परस्पर प्रगतीसाठी एकत्र काम करू.
तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणाले की, आज परिस्थिती बदलण्याची गरज आहे, आम्ही यावर सहमत आहोत. त्यासाठी सर्व समविचारी पक्षांशी चर्चा करू. महाराष्ट्रातून सुरू झालेल्या प्रत्येक आंदोलनाला यश मिळालं आहे. आम्हाला अन्यायाविरुद्ध लढायचं आहे. आज पावसाशीही संयुक्त लढा सुरू आहे. मी उद्धव ठाकरेंना तेलंगणात येण्याचं निमंत्रण दिलं आहे. केसीआर म्हणाले की, मला महाराष्ट्रात खूप प्रेम मिळालं.
केसीआर यांनी शरद पवार यांचीही भेट घेतली
मुंबईत पोहोचलेल्या केसीआर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. केसीआर आणि शरद पवार यांच्या भेटीत पवारांच्या कन्या सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. दुसरीकडं भाजप नेते सुनील देवधर यांनी केसीआर आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर टोला लगावला आहे. सुनील देवधर यांनी याला वेळेचा अपव्यय म्हटलं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे