मुंबई, २७ सप्टेंबर २०२०: हॉटेल ग्रँड हयात याठिकाणी शिवसेना खासदार संजय राऊत आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक झाल्याची बातमी समोर आली आणि राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं. मात्र ह्या भेटीला कुठलाही राजकीय संदर्भ नसल्याचं भाजप नेते तथा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितलं आहे.
शनिवारी दि. २६ सप्टेंबरला देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये गुप्त भेट झाली होती. सुरुवातीला संजय राऊतांनी या भेटीचा इन्कार केला, मात्र नंतर ही भेट झाल्याचं त्यांनी मान्य केलं. पण ही भेट राजकीय नसून ”सामना”च्या मुलाखातीसाठी होती असं संजय राऊत म्हणाले.
भाजप आमदार प्रवीण दरेकरांनीही ही भेट राजकीय नसल्याचं ट्विटरद्वारे सांगितलं आहे. ”माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट झाली आहे. संजय राऊत यांनी सामनासाठी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. त्यावर या मुलाखतीसाठी एकदा भेटण्याचे ठरले होते. ती संपूर्ण मुलाखत अनएडिटेड जावी, अशी देवेंद्र फडणवीस यांची इच्छा असल्याने एकदा भेटून प्रारूप ठरविण्यासाठी ही भेट झाली. बिहार निवडणुकीतून परतल्यानंतर ही मुलाखत देण्याचे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सांगितले आहे. या भेटीला कुठलाही राजकीय संदर्भ नाही.” असं प्रवीण दरेकर म्हणाले.
राजकीय वर्तुळात मात्र या भेटीनंतर उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेना पुन्हा भाजपसोबत युती करणार का? असा प्रश्न दबक्या आवाजात विचारला जातोय. अनेकजण अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीचा संदर्भ देत ”राजकारणात काहीही होऊ शकतं” असं म्हणत या भेटीमागं काहीतरी गुपित असल्याचं बोलतायत. महाराष्ट्रात नाट्यमय पद्धतीनं झालेल्या सत्तापालटात संजय राऊतांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळेच त्यांच्या फडणवीस भेटला अनेक अँगलने पाहिलं जातंय. मात्र नक्की खरं काय ते येणारा काळच सांगू शकेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे.