‘तुझ्यासारख्या कलाकाराकडून हे अपेक्षित नव्हतं’; श्रेयस तळपदेवर नेटकरी संतापले

मुंबई, १४ फेब्रुवारी २०२३ : चित्रपट अभिनेता श्रेयस तळपदेचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कमाल धमाल मालामाल’ या त्याच्या चित्रपटातील एका दृश्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या व्हिडिओमध्ये श्रेयस तळपदे ओमच्या चिन्हावर पाय ठेवताना दिसतो आहे. आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याने माफी मागितली आहे. यासोबतच त्याने स्पष्टीकरणही दिले आहे.

दहा वर्षांपूर्वीच्या चित्रपटातील सीनमुळे श्रेयसला मागावी लागली माफी. नक्की कोणता आहे सीन-

श्रेयस तळपदेचा एक ॲक्शन सीन सुरू आहे ज्यामध्ये श्रेयस व्हॅनला थांबविण्यासाठी जातो आणि ती व्हॅन पायाने थांबवितो. ज्या ठिकाणी तो पाय ठेवतो त्या ठिकाणी ओम चिन्ह पाहायला मिळतं. एवढेच नाही तर त्यावेळी श्रेयसने गळ्यात क्रॉस चिन्ह असलेले लॉकेटही घातले आहे. त्यामुळे ख्रिश्चन लोक इतर धर्मांचा असा अपमान करीत असूनही हे चित्रपट कसे पाहिले जातात? असा प्रश्न करीत जेम्स ऑफ बॉलिवूड या फॅन पेजवरून हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला.

श्रेयस तळपदे याने दिलगिरी व्यक्त करीत लिहिले आहे, मला माफ करा.

ट्विटरवर ही बातमी व्हायरल झाल्यानंतर आता श्रेयस तळपदेने माफी मागताना लिहिले आहे, की मला माफ करा. शूट करताना अनेक घटक असतात. विशेष करून ॲक्शन सीन शूट करताना एखाद्याची मानसिकता, सिन्ससाठी दिला गेलेला वेळ आणि दिग्दर्शकांच्या सूचना यासह इतर बऱ्याच गोष्टींचा समावेश असतो; पण या व्हिडिओत तुम्ही जे पाहत आहात त्यासाठी मी कोणतेही स्पष्टीकरण देण्याचा किंवा स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करीत नाहीये. मी ते पाहायला हवे होते आणि दिग्दर्शकांच्याही ती गोष्ट लक्षात आणून द्यायला हवी होती. मी जाणूनबुजून कोणाच्याही भावना दुखावणार नाही आणि अशी गोष्ट पुन्हा माझ्याकडून घडणारही नाही.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा