असा असेल पंतप्रधानांचा राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम

5

अयोध्या (उत्तर प्रदेश), ४ ऑगस्ट २०२०: हिंदूंच्या आस्थेचे प्रमुख स्थान असलेले आयोध्या येथील राम मंदिराच्या बांधकामाचे स्वप्न अखेर पूर्ण होत असल्याचे दिसत आहे. उद्या म्हणजेच ५ ऑगस्ट रोजी राम मंदिराच्या बांधकामासाठी भूमिपूजन करण्यात येणार आहे. यासाठी उत्तर प्रदेश सरकारने सर्व सुरक्षेविषयी व्यवस्था करून ठेवली आहे. तसेच या समारंभाची तयारी देखील पूर्ण झाली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल या सर्व तयारीचा आढावा घेतला. या कार्यक्रमासाठी संबंधित व्यक्तींना आमंत्रण देखील पाठवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्यामुळे सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

अयोध्येतील प्रस्तावित राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी १७५ लोकांना आमंत्रण देण्यात आले आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व मार्गदर्शक तत्वांचे देखील पालन करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जवळपास तीन तास अयोध्या दौऱ्यावर असतील. यामध्ये मंदिराचे दर्शन, पूजा अशा कार्यक्रमांचा समावेश आहे.

कसे असेल पंतप्रधानांचे या कार्यक्रमासाठी नियोजन

> ५ ऑगस्ट सकाळी ९,३५ वाजता दिल्लीतून प्रस्थान

> १०.३५ वाजता लखनौ विमानतळावर आगमन

> १०.४० वाजता अयोध्येसाठी हेलिकॉप्टरमधून प्रस्थान

> ११.३० वाजता अयोध्येतील साकेत कॉलेजच्या हेलिपॅडवर लँडिंग

> ११.४० हनुमानगढी येथे पोहोचून दर्शन आणि पूजा

> १२.०० वाजता राम जन्मभूमी परिसरात पोहोचण्याचा कार्यक्रम

> १२.१५ वाजता परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम

> १२.३० वाजता भूमिपूजनाचा कार्यक्रम

> १२.४० राम मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम

> २ .०५ वाजता साकेत कॉलेजच्या हेलिपॅडसाठी प्रस्थान

> २ .२० वाजता लखनौसाठी प्रस्थान

> लखनौ वरून दिल्लीसाठी रवाना

उद्या होणाऱ्या या भूमिपूजन कार्यक्रमाच्या पार्श्‍वभूमीवर आज आयोध्यामध्ये सुरक्षितते खातिर बंदोबस्त करण्यात आला आहे. पूर्ण आयोध्या सील करण्यात आली असून सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. आमंत्रित असलेले १७५ पाहुणे आजच अयोध्यामध्ये दाखल होणार आहेत. आमंत्रित पाहुण्यांच्या आमंत्रणपत्रावर एक कोड देण्यात आला आहे. सुरक्षेची दखल घेत हा कोड देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

करोना महामारीमुळे मोठ्या प्रमाणात खबरदारी घेण्यात येत आहे. यामुळे काही दिग्गज या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत. भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह काही नेते या कार्यक्रमाला येणार नाही. या कार्यक्रमासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचीही व्यवस्था केली जात आहे. या व्यतिरिक्त कल्याण सिंह, उमा भारती, मुरली मनोहर जोशी हे देखील उपस्थित राहणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा