पुणे, दि.२९मे २०२०: कोरोना संकटामुळे यंदाचा पायी पालखी वारीचा सोहळा रद्द करण्यात आला आहे. दिंड्यांना ही परवानगी नाकारली आहे. वारकरी आणि प्रशासनाचे एकमत झाले आहे. तसेच आळंदी आणि देहूच्या पादुका दशमीला पादुका हेलिकॉप्टर, वाहन किंवा विमानाने पंढरपूरला देवभेटीस जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
पुण्यात वारी संदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत पायी वारी सोहळ्याबाबत आळंदी देवस्थानचे चोपदार, आळंदी, देहू आणि सोपानकाका संस्थानच्या विश्वस्तांनी त्यांच्या भूमिका मांडल्या.
त्यानंतर आळंदी आणि देहूवरुन निघणाऱ्या पादुका हेलिकॉप्टर, एसटी किंवा विमानाने पंढरपूरला नेण्यात याव्यात, असा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. याबाबत दशमीला निर्णय स्पष्ट होईल. त्यामुळे यंदाची पायी वारी रद्द करण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.
न्युज अनकट प्रतिनिधी: प्रशांत श्रीमंदिलकर