नाशिक, ५ ऑगस्ट २०२३ : काल काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिलासा देत सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली. त्यामुळे राहुल गांधी यांचा खासदारकीचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयानंतर काँग्रेसकडून जल्लोष करण्यात येत आहेत. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. कालपर्यंत सुप्रीम कोर्टाला शिव्या देणारे आज गुणगान गात आहेत याचे मला समाधान आहे, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
न्यायालय दबावाखाली काम करत आहे असा सवाल देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर कोर्ट दबावाखाली काम करतय, असे सुप्रीम कोर्टाने म्हटलेल नाही. राहुल गांधी यांनी म्हटलेले कसे अयोग्य आहे आणि उच्च पदस्थ व्यक्तीने असे का म्हणू नये हे देखील कोर्टाने सांगितले आहे. कालपर्यंत सर्वोच्च न्यायालयाला शिव्या देणारे सर्वच काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षाचे नेते सर्वोच्च न्यायालयाचे गुणगान करत आहेत याच मला समाधान आहे असे फडणवीस म्हणाले.
यातून एक गोष्ट स्पष्ट दिसते की, आम्हाला न्याय मिळाला तर सुप्रीम कोर्ट चांगले आणि विरोधात निर्णय आला तर सुप्रीम कोर्ट वाईट. भारताच्या संविधानाने तयार केलेल्या संस्थांना हे लोक कशाप्रकारे नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचे पावित्र्य कसे नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे आता त्यांच्या बोलण्यावरून निश्चितपणे स्पष्ट झाले, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर