मुंबई, २५ ऑक्टोंबर २०२२ : राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, तर याची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथे दौरा केला. त्यांनी ओल्या दुष्काळाचीही पाहणीही केली. घोषणांची अतिवृष्टी करणारे निर्दयी सरकार भावनाशून्य तर आहेच पण उत्सवीही आहे, अशी टीका करत अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी केलेल्या हेक्टरी ५० हजार रुपये मदत मागणीच्या पाठिशी शिवसेना उभी राहील, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले.
दरम्यान या टीकेवरून शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार, संजय शिरसाठ आणि भाजप नेते लक्षण ढोबळे यांच्या नंतर आता मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. ज्यांनी अडीच वर्षात शेतकऱ्यांसाठी काहीच केलं नाही. ज्यांनी अडीच वर्ष शेतकऱ्यांचे कधी अश्रू पुसले नाहीत. जे कधी घरातून बाहेर पडले नाही. ते आज आमच्यावर टीका करत आहेत, खरं तर सत्तेत आल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक उपाय योजना करण्यात आल्या आहेत.
परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीनंतर शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मदत देण्यात येत आहे. मात्र, काही लोकांच्या डोळ्यात ही मदत खूपत आहे, कोरोनाची दोन वर्ष वेदनादायी होती. आता नवीन सरकारने आपल्या सणांवरच्या सर्व मर्यादा काढल्या आहेत. त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणात राज्यात सांस्कृतीक कार्यक्रम साजरे करण्यात येत आहे, असे आशिष शेलार म्हणाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे