मंचर,दि. २५ एप्रिल २०२० :महाराष्ट्रातील ऐतिहासिक व पुरातत्व वास्तूंचे जतन संवर्धनाचे काम करणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना पूर्ववत सेवेत रुजू करावे अशी मागणी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याकडे केली आहे.
केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्यात भारतीय पुरातत्व विभागाअंतर्गत काम करीत असलेल्या १२१ कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याचा निर्णय अतिशय निंदनीय आहे. हि माहिती समजल्यावर लगेच पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्यासह भारत सरकारचे सांस्कृतिक व पर्यटन मंत्री प्रहलाद सिंग पटेल व भारतीय पुरातत्व विभागाच्या महानिदेशक श्रीमती उषा शर्मा यांना पत्रव्यवहार करून महाराष्ट्रातील पुरातत्व व ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धनाचे कार्य करणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याचा निर्णय मागे घ्यावा अशी आग्रही मागणी पाटील यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.
एकीकडे मा. पंतप्रधान देशातील सर्व उद्योग व्यावसायिकांना आवाहन करून कामगारांना कामावरून कमी करू नये असे आवाहन करीत आहे तर दुसरीकडे केंद्र सरकारच्या अखत्यारीतील मंत्रालयामधील कर्मचाऱ्यांना अशा कठीण परिस्थितीत कामावरून कमी केले जात आहे हि अतिशय दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे स्वतः मा. पंतप्रधान यांनी यामध्ये लक्ष घालून हा निर्णय तात्काळ मागे घेण्याबाबत केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्रालयास आदेश द्यावेत तसेच मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे या विषयात लक्ष घालून महाराष्ट्रातील ऐतिहासिक व पुरातत्व स्थळांचा वारसा जपण्यासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पूर्ववत सेवेत रुजू करून घेतील असा विश्वास देखील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केला .
न्यूज अनकट प्रतिनिधी – साईदिप ढोबळे