कल्याण-डोंबिवली, दि. २४ जुलै २०२०: अयोध्येत राममंदिर बांधण्याची तयारी आता सुरू झाली आहे. मंदिराचे काम करण्यासाठी आता मुहुर्त देखील काढण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर अयोध्येत राममंदिर बांधून कोरोना जाणार नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केली होती. या टीकेला प्रत्युत्तर म्हणून भाजप युवा मोर्चातर्फे राज्यभरातून जय श्रीराम लिहिलेली १० लाख पत्रे त्यांना पाठविली जाणार आहेत. या आंदोलनात कल्याण-डोंबिवली सुद्धा मागे नाही. गुरुवारी शरद पवारांना कल्याण-डोंबिवलीतून हजारो पत्रे पाठवण्यात आली.
पवार यांनी अशा प्रकारची टीका करणे योग्य नाही. राम मंदिर बांधून कोरोना जाणार नाही, हे आम्हालाही माहीत आहे. येत्या ५ ऑगस्टला अयोध्येत रामजन्मभूमी मंदिराचा शिलान्यास होत आहे. या चांगल्या कार्यक्रमात त्यांना सहभागी व्हायचे नसेल, तर त्यांनी होऊ नये. हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र, चांगल्या कामात मिठाचा खडा टाकू नये. असे वक्तव्य भाजप युवा मोर्चाचे सचिव निखिल चव्हाण यांनी केले.
शरद पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर म्हणून त्यांच्या सिल्व्हर ओक या घरी कल्याणमधून किमान २० हजार पत्रे पाठविली जाणार आहेत. दरम्यान, डोंबिवलीतूनही पवार यांना हजारो पत्रे पाठवण्यात आली. डोंबिवलीतील मुख्य पोस्ट ऑफिस येथे युवा मोर्चाचे मंडळ अध्यक्ष मिहीर देसाई, डोंबिवली ग्रामीण युवा मोर्चा अध्यक्ष अमित चिकणकर यांनी ही पत्रे जमा केली. त्यामुळे ही संतापाची साट किती पसरते आणि शरद पवारांची यावर काय प्रतिक्रिया देतील हे पाहणे महत्वाचे ठरेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राजश्री वाघमारे