मुंबई, ३ फेब्रुवारी २०२३ : ‘नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी’ला (एनआयए) मुंबईत दहशतवादी हल्ला होणार असल्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाला आहे. सूत्रांनी सांगितले, की राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) ई-मेल आयडीवर हा मेल आला होता. त्यानंतर देशातील विविध शहरांना सतर्क करण्यात आले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मुंबई पोलिसांना ही माहिती दिली आहे.
ई-मेलमध्ये स्वत:चे तालिबान असल्याचे वर्णन केले असून, तालिबान संघटनेचा प्रमुख नेता सिराजुद्दीन हक्कानीच्या आदेशानुसार हे घडत असल्याचा दावा केला आहे. या ई-मेलनंतर इतर यंत्रणांसह मुंबई पोलिसही तपासात गुंतले आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मुंबई पोलिसांना दिलेल्या इनपुटनंतर पोलिसही सतर्क झाले आहेत. मुंबई पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणे, विमानतळ, रेल्वेस्थानक यांसह अनेक ठिकाणी तपासासोबत सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे.
तपास संस्थेच्या मुंबई कार्यालयाला गुरुवारी धमकीचा ई-मेल प्राप्त झाला. त्यानंतर महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि शहर पोलिसांना याची माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सीआयएच्’या ई-मेल आयडीवरून पाठविलेल्या या संदेशात प्रेषकाने दावा केला आहे, की तालिबानशी संबंधित एक व्यक्ती शहरात हल्ला करेल. पाठविणाऱ्याचा आयपी (इंटरनेट प्रोटोकॉल) पत्ता पाकिस्तानचा आहे.
अधिकाऱ्याने सांगितले, की असा ई-मेल गेल्या महिन्यातही फेडरल एजन्सीला पाठविण्यात आला होता; मात्र पोलिसांच्या तपासात हा ई-मेल खोटा असल्याचे सिद्ध झाले. अधिकाऱ्याने सांगितले, की पोलिसांना यामागे काही गैरप्रकार असल्याचा संशय आहे, कारण यापूर्वीही अनेकदा असे ई-मेल एजन्सीला पाठविले गेले आहेत.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड