‘अंनिस’चे संस्थापक अध्यक्ष श्याम मानव यांना ठार मारण्याची धमकी

नागपूर, २३ जानेवारी २०२३ : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष श्याम मानव यांना ठार मारण्याची धमकी आली आहे. तुमचा नरेंद्र दाभोलकर करू, अशी धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बागेश्वर बाबा ऊर्फ धीरेंद्र महाराजांच्या भक्तांनी ही धमकी दिल्याचे म्हटले जात आहे.

एकानंतर एक चमत्कारांचा दावा करणाऱ्या बागेश्वर बाबांना ‘अंनिस’तर्फे आव्हान देण्यात आले होते. त्यामुळेच श्याम मानव यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे श्याम मानव यांच्या रवी भवन येथील सरकारी निवासस्थानी सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य आणि श्याम मानव यांच्या मुलाच्या मोबाईलवर धमकीचे संदेश आल्याची माहिती उघड झाली आहे. ‘अंनिस’चे नेते हरीश देशमुख यांनी यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली आहे. उद्या दुपारपर्यंत तुमची गोळी घालून हत्या करण्यात येईल, तुम्ही शांत बसा, अशा आशयाचे संदेश कार्यकर्त्यांच्या मोबाईलवर आले आहेत.

लोकांच्या मनातलं ओळखण्याची; तसंच अनोळखी व्यक्तीविषयी माहिती सांगण्याची दिव्यदृष्टी आपल्याकडे असल्याचा दावा करणाऱ्या बागेश्वर बाबा यांना श्याम मानव यांनी आव्हान दिलं आहे. बागेश्वर बाबा ऊर्फ धीरेंद्र महाराज नागपुरात आले असताना श्याम मानव यांनी त्यांना चॅलेंज दिलं होतं. दिव्य शक्ती सिद्ध करून दाखविल्यास त्यांना ३० लाखांचं बक्षीस देऊ, असं ते म्हणाले होते; तसेच महाराष्ट्रातील जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार, बागेश्वर बाबांविरोधात गुन्हा दाखल होऊ शकतो, असा इशाराही श्याम मानव यांनी दिला होता. त्यानंतर बाबांच्या भक्तांनी श्याम मानव यांना धमकीचे मेसेज केले असतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, श्याम मानव यांना ठार मारण्याची धमकी दिल्यानंतर याविषयी पोलिसांत रीतसर तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर श्याम मानव यांच्या नागपूर येथील घराची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.

श्याम मानव यांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र स्पेशल प्रोटेक्शन युनिटसोबत आधी दोन जवान तैनात असायचे. आता त्यात आणखी दोन बंदूकधारी; तसेच तीन पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश झाला आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा