नागपूर, १९ जानेवारी २०२४ : मागील वर्षी समृद्धी महामार्गावर १ जुलै २०२३ रोजी ट्रॅव्हल्स अपघात झाला होता. त्यात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातात वर्धा येथील प्रवाशांची संख्या मोठी होती. या अपघातानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत घोषित केली होती. त्यावेळी ते जिल्ह्याचे पालकमंत्री आणि वित्तमंत्री सुद्धा होते. मदतीचे आश्वासन देऊन २०० दिवस उलटले तरी अपघातग्रस्त कुटूंबीयांना पूर्ण मदत मिळाली नाही. २५ लाखापैकी प्रत्येकी ५ लाख रूपये देऊन शासनाने बोळवण केली असल्याचा आरोप पिडीतांनी केला आहे.
त्यासाठी मागील ४२ दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा येथे अपघातग्रस्तांचे कुटूंबीयांचे साखळी उपोषण सुरू आहे. या कालावधीत अनेक दिग्गज नेतेमंडळीनी न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले, मात्र इतके दिवस उलटूनही अद्याप न्याय मिळाला नाही. शासनाने हेतू पूरस्पर दूर्लक्ष केले असल्याचे यावेळी पिडीत सांगत होते. सध्या राज्यात रामनामाचा गजर होत आहे, आता याच रामनामाचा वापर करत आम्हीही उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील जनसंपर्क कार्यालयासमोर १९ जानेवारीपासून रामनाम जपत बसणार असल्याची माहीती पिडीत कुटूंबियाकडून टिळक पत्रकार भवनातील पत्रकार परिषदेत देण्यात आली.
न्युज अनकट प्रतिनीधी : नीता सोनवणे