वडकी सासवड रोड येथील खुन प्रकरणातील तिघे आरोपी ४८ तासात जेरबंद

वडकी, ३० जानेवारी २०२१: वडकी पुणे -सासवड या वाहतुकीचे रस्त्यालगत भरदिवसा कोयता, चाकू व रॉडने वार करून झालेल्या खून प्रकरणातील फरारी तिघे आरोपी ४८ तासांच्या आत स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने जेरबंद केल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली आहे.

दि. २७ जानेवारी २०२१ रोजी दुपारी १२.०० च्या सुमारास पुणे-सासवड रोड वडकी येथील विजय हॉटेल समोरील हिंदवी स्नॅक्स सेंटर ता. हवेली जि. पुणे येथे तुषार खंडु चव्‍हाण वय २१ रा. वडकी, गायदरा ता. हवेली जि. पुणे व त्याचा मित्र फिर्यादी शुभम बापु पवार वय २१ वर्ष रा. वडकीनाला, ता. हवेली जि. पुणे असे चहा पित बसले असताना आरोपी अमोल जाधव, अमित जाधव, कालीदास जाधव, सर्व रा. गायदरा वडकी ता. हवेली जि. पुणे व इतर एक अनोळखी यांनी जुन्या घरगुती भांडणाचे कारणावरून चिडुन त्यांचेकडील मोटार दोन सायकलवरून येवुन शुभम पवार यास पाठीमागुन धरून पोटाला चाकू लावून जीवे मारण्याची धमकी देवुन यातील इतर तिघांनी तुषार चव्हाण वय २१ याच्या डोक्यात व पोटावर कोयता, लोखंडी राॅड व चाकुने क्रूर पद्धतीने वार करून त्याचा खुन केला. ते मोटरसायकलवर हडपसर बाजूकडे पळून गेले असल्याचे असे मजकुराचे फिर्यादीवरून लोणीकाळभोर पोलीस स्टेशनला दिलेले फिर्यादीवरून भादंवि कलम ३०२ तसेच आर्म ॲक्ट कलम ४,२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

सदर गुन्ह्यात पुणे-सासवड या वाहतुकीचे रस्त्यालगत भरदिवसा कोयता, चाकू व रॉडने क्रूर पद्धतीने मारहाण खुन करून आरोपी फरार झालेले होते. गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी लोणीकाळभोर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांना आरोपी पकडणेबाबत सूचना दिल्या होत्या. तसेच गुन्ह्याचा समांतर तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना स्थानिक गुन्हे शाखेचे वेगळे पथक नेमण्या बाबत आदेश दिले होते. त्याप्रमाणे तपासासाठी लोणीकाळभोर पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके नेमण्यात आली होती.

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली नेमलेले पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरु गायकवाड, राजेंद्र थोरात, मुकुंद आयाचीत, राजेंद्र पुणेकर, प्रसन्न घाडगे, समाधान नाईकनवरे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देवून गुन्ह्याची माहिती घेऊन तपासाला सुरुवात केली होती. त्याप्रमाणे आजूबाजूच्या गावातील सीसीटीव्ही फुटेज पडताळणी केली व आरोपीचा जाणेयेण्याचा मार्ग याबाबत स्थानिक गावकऱ्यांकडे सुद्धा चौकशी केली होती. त्यातूनच गुन्हे शाखेचे पथकाला गोपनीय बातमीदारा मार्फत मिळालेल्या बातमीवरुन गुन्ह्यातील आरोपी नामे अमोल उर्फ पप्या विष्णू जाधव वय ३० वर्षे, अमित उर्फ दत्ता विष्णू जाधव वय ३३ वर्षे, कालीदास उर्फ सागर मल्हारी जाधव वय २७ वर्षे, सर्व रा. गायदरा वडकी ता. हवेली जि. पुणे यांना आळंदी फाटा लोणीकंद येथे साध्या वेशात सापळा रचून ताब्यात घेतले आहे.

त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याचे सांगून गुन्हा करताना त्यांचेसोबत मंगेश बाळासाहेब चव्हाण राहणार नांदोशी ता. हवेली जि. पुणे सध्या राहणार भेकराईनगर हडपसर पुणे हा असल्याचे सांगितले व सदर तिघे आरोपी यांना पुढील तपासकामी लोणीकाळभोर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. यातील आरोपी मंगेश चव्हाण हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी हवेली पोलीस स्टेशनला खुनाचा प्रयत्नाचा गंभीर गुन्हा दाखल आहे.

गुन्ह्याचा पुढील अधिक तपास आरोपींची मेहरबान कोर्टाकडून पोलीस कस्टडी रिमांड घेऊन लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांचे मार्गदर्शनाखाली उरुळीदेवाची दूरक्षेत्राचे सहा. पोलीस निरीक्षक लोखंडे हे करीत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा