वाईत पर्यटकांच्या बसवर दगडफेक, तीनजण जखमी

वाई, १७ जुलै २०२३: वाई शहरात महागणपतीच्या दर्शनाला आलेले पर्यटक व स्थानिक यांच्यात पार्किंगवरुन वाद झाला. त्यातून परिसरातील काही युवकांनी बसवर दगडफेक केली. त्यामुळे महागणपती पुलावर नाना-नानी पार्कजवळ, रस्त्यावर बसच्या काचांचा खच पडला होता. या दगडफेकीमध्ये तीन पर्यटक जखमी झाले आहेत.
पालघर तालुक्यातील एडवन गावातील ग्रामस्थ आपल्या कुटुंबीयांना सोबत घेऊन मांढरदेव येथे दर्शनासाठी निघाले होते.

यावेळी वाईत महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी ते थांबले. दरम्यान बसचा चालक पुलाजवळ बस पार्क करत असताना, तेथे असणाऱ्या वस्तीतील मुलांबरोबर बस लावण्याच्या जागेवरून किरकोळ बाचाबाची झाली. त्याचे रुपांतर पुढे हाणामारीत झाले. या घटनेची माहिती जवळच्या दुसऱ्या वस्तीत समजल्यानंतर तेथील तरुण, महिला पुलावर पोहोचले व बसवर हल्ला चढवला.

यात बसच्या काचा फोडल्या. त्यामध्ये जितेंद्र प्रभाकर तरे, मोहन हरिश्चंद्र तरे, प्रतीक दिलीप तरे हे जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी वाई पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. काही महिलांही किरकोळ जखमी झाल्या आहेत. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचल्यांने पुढचा अनर्थ टळला असून काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा