उभ्या ट्रकला कारची धडक तर ३ जणांचा मृत्यू

नागपूर, १० जुलै २०२३: रविवारी रामटेक- भंडारा रस्त्यावरील आरोली खंडाळा गावाजवळ उभ्या असलेल्या ट्रकवर कार आदळली. या अपघातात दोन लहान मुलांसह आणि एका वृद्धाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी आरोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामटेकला भेट देऊन सदर कुटुंब भंडारा येथे परतत असताना हा अपघात झाला. राजेश परसराम भेंडारकर (३४), दुर्गा राजेश भेंडारकर (३२), मेघा चंद्रहास बोंद्रे (३१), परसराम लहानू भेंडारकर (७०), सीताबाई परसराम भेंडारकर (६४), हिमांशू राजेश भेंडारकर , भार्गवी चंद्रहास बोंद्रे आणि भव्य चंद्रहास बोंद्रे हे सर्वजण सोनकापलास गाव ता. साकोली जि. भंडारा येथील रहिवासी असुन ते अपघातग्रस्त झाले आहेत.

हे सर्वजण एमएच-३६ / एच-८४०३ क्रमांकाच्या कारने रामटेक देवाला भेट देण्यासाठी आले होते. दर्शन करून परतत असताना दुपारी ३.३० च्या सुमारास रामटेक-भंडारा रस्त्यावरील आरोली खंडाळा गावाजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एमएच-४०/ सीडी-९८०२ क्रमांकाच्या ट्रकला कारने मागून धडक दिली.

कार राजेश भेंडारकर चालवत होता. ही धडक इतकी जोरदार होती की कारमधील सर्व जण गंभीर जखमी झाले. जखमींना रामटेकच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. येथे उपचारादरम्यान परसराम लहानू भेंडारकर (७०) यांचा मृत्यू झाला. तर इतरांची प्रकृती गंभीर असल्याने सर्वांना नागपुरातील मायो रुग्णालयात नेण्यात आले आहे. हिमांशू भेंडाकर आणि भार्गवी बोंद्रे या ८ महिन्यांच्या लहान मुलांचाही रात्री उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोली पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा