भिवंडी, ३० एप्रिल २०२३: मुंबईला लागून असलेल्या भिवंडीत इमारत दुर्घटनेला १९ तास उलटल्यानंतरही बचाव पथके ढिगाऱ्याखाली जीव शोधत आहेत. ढिगाऱ्याखाली अजून सात जण अडकले असण्याची भीती व्यक्त केली जाते. त्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथके ढिगारा हटवण्याचा प्रयत्न करत आहेत. अग्निशमन दल, पोलीस, टीडीआरएफ आणि एनडीआरएफच्या पथकांनी आतापर्यंत १४ जणांची सुटका केली तर तीन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
अपघात होताच परिसरातील नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. यानंतर बचाव पथकाने ढिगाऱ्याखालून १४ जणांना जिवंत वाचवले. मात्र, या काळात तीन जणांचे मृतदेहही बाहेर काढण्यात आले. रविवारी सकाळी बचावकार्यात सहभागी असलेल्या एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बराचसा ढिगारा हटवण्यात आला, मात्र अजूनही सात लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे बचाव पथक जेसीबी आणि हाताने ढिगारा हटवण्याचे काम करत आहेत.
आत अडकलेल्या सर्व लोकांना जिवंत वाचवण्याचा या संघांचा प्रयत्न चालू आहे. दुसरीकडे, अपघाताची माहिती मिळताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने जिल्हा प्रशासनाशी संवाद साधला. सर्व मृतांसाठी मुख्यमंत्री मदत निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याचे आदेश देत त्यांनी सर्व जखमींवर सरकारी खर्चाने उपचार करण्यास सांगितले. त्यांनी स्वतः रात्री उशिरा घटनास्थळी पोहोचून बचाव कार्याचा आढावा घेतला आणि रुग्णालयात जखमींची विचारपूस केली.
न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड